दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला छात्र भारतीचा पाठिंबा; करमाळ्यात केंद्र सरकारविरोधात निदर्शने

करमाळा(प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत छात्र भारती, करमाळा यांच्या वतीने केंद्र सरकारचा व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देत विद्यार्थ्यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे मागील २१ दिवसांपासून अनेक विद्यार्थी NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

लाठीमाराचा निषेध
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा आणि आंदोलन दडपण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेल्या कारवाईचा छात्र भारतीने तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी “लोकशाही जिंदाबाद”, “विद्यार्थी एकता जिंदाबाद” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास लोकशाही मार्गाने महाराष्ट्रासह देशभरात यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
यावेळी छात्र भारतीचे राज्य सदस्य सौरव शिंपी, पुणे जिल्हा सहसंघटक महेश पवार, तालुका समन्वयक प्रथमेश जाधव, तसेच प्रसाद काळे, अमित थोरात, रतन सिंग, अशोक साडेकर, समर्थ सुरवसे, प्रज्वल गबाले, मयूर फंड आणि आकाश वीर उपस्थित होते.


