
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.३० : सैराट चित्रपटातून “सल्ल्या” या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले मराठी चित्रपट अभिनेते अरबाज शेख यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे वडील असलम रसूल शेख (वय ६०) यांचे गुरुवारी सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मागील २९ जून रोजी असलम शेख यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना प्रथम करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
याच उपचारादरम्यान संबंधित रुग्णालयातील औषधे व वैद्यकीय साहित्य केवळ त्यांच्या संलग्न औषध दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप समोर आला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अरबाज शेख यांनी या प्रकाराचा ऑडिओ पुरावा सार्वजनिक करत हा प्रकार उघडकीस आणला. या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती.

या प्रकरणाची दखल घेत शिवसेना वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार अरबाज शेख यांची भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उपचारासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच असलम शेख यांना सोलापूरमधील एका नामांकित रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फतही त्यांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
वैद्यकीय उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी असलम रसूल शेख यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यावर गुरुवारी (ता.३०)रात्री उशिरा करमाळा तालुक्यातील जेऊर येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये धार्मिक विधीनुसार दफनविधी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

