प्रताप बरडे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान

करमाळा : आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा व यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. प्रताप रंगनाथ बरडे यांना प्रदान करण्यात आला.
यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, करमाळा तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे, विवेक येवले तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे या मान्यवरांच्या हस्ते तसेच सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत यश कल्याणी सेवा भवन, करमाळा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.

श्री. प्रताप बरडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झाले आहेत. तसेच कबड्डी, खो-खो व कुस्ती या क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना निर्माण करत खेळाडू घडवण्याचे काम केले आहे. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत श्री. बरडे यांनी सैनिकांना राख्या पाठविणे, पालखी सोहळ्यात हजारो वारकऱ्यांसाठी अन्नदान, वृक्षारोपण, जलसंवर्धन तसेच कोरोना काळात गरजू नागरिकांना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे.

श्री बरडे यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष एकनाथराव काकडे, सचिव भैय्यासाहेब काकडे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, रावगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

