केम येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ब्रह्मचैतन्य विद्या गिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

केम (संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त ब्रह्मचैतन्य विद्या गिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती महंत जयंत गिरी महाराज व श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
बुधवार, दिनांक २९ जुलै रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत श्री उत्तरेश्वर महाराज व मंदिर परिसरातील सर्व समाधींना अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. स्वप्नील शिंदे महाराज (पाथर्डी) यांचे हरिकीर्तन होणार आहे. दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक कार्यक्रमास केम व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महंत जयंत गिरी महाराज यांनी केले आहे.
