“शब्दांची श्रीमंती, आवाजाची ताकद आणि अभ्यासाची जोड म्हणजेच: सचिन नवले”

0

करमाळा: प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात यशाचा मार्ग कधीच  सहज सोपा नसतो.  जो व्यक्ती संघर्ष, कष्ट, अपयश आणि सातत्य या चार गोष्टी जो अंगीकारतो, त्यालाच यश मिळते.  करमाळा तालुक्यात आपल्या ओघवत्या वाणीने भारदस्त आवाजाने आणि अभ्यासपूर्ण निवेदनाने  स्वतंत्र ओळख निर्माण करणारे सचिन किसन नवले यांचा प्रवास आसाच घडला आहे.

कोर्टी या गावात एका अत्यंत सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म २३ जून १९८९ साली झाला. आर्थिक स्थिती बेताची असलीतरी शिक्षणाचं स्वप्न मोठ होतं. अशा परिस्थितीत वडिल कै. किसन नवले आणि भाऊ सोमनाथ यांनी पारंपरिक लॉन्ड्री व्यवसाय करून व आई रुक्मीणीबाई यांनी मजुरी करुन सचिन यांच्या शिक्षणाची जबाबदारीही पेलली.
त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोर्टी येथे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पदवीपर्यंत चे शिक्षण घेतले. त्यानंतर दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथून एम.ए. ची पदवी संपादन केली. उच्चशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील एका खाजगी कंपनीत वर्षभर नोकरी केली. पुढे विहाळ येथील भैरवनाथ सहकारी साखर कारखान्यातही काही काळ काम केले. मात्र, त्यांचे मन नोकरीत  कधीच रमले नाही. नियतीने त्यांच्यासाठी वेगळेच व्यासपीठ राखून ठेवले होते.

सन २०१४ मध्ये मिरजगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांचा एक शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सूत्रसंचालनासाठी तिथे कोणी उपलब्ध नसल्याने सचिन नवले यांनी धाडसाने पुढाकार घेतला आणि पहिल्यांदाच मोठ्या व्यासपीठावर सुत्रसंचालन केले. त्यांची शब्दांवरील पकड, आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरण पाहून उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. तो क्षणच त्यांच्या नव्या प्रवासाचा आरंभ ठरला.
त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर करमाळा तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यक्रम, आणि पुढे पुण्यातील प्रतिष्ठेच्या बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत त्यांच्या आवाजाने व्यासपीठ गाजवून सोडले. आज त्यांच्या नावाची  “भारदस्त निवेदक” अशी स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

या यशामागे केवळ आवाज नाही, तर अभ्यासाची मोठी शिदोरी आहे. लहानपणापासूनच शालेय स्नेहसंमेलने, गाणी, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्यक्रम यात सहभाग घेतल्यामुळे त्यांना स्टेज डेरींग होतेच.
करमाळ्यात यशकल्याणी संस्थेच्या माध्यमातून त्यांना सुरुवातीला व्यासपीठ मिळाले. त्यानंतर विविध संस्था, संघटना आणि राजकीय कार्यक्रमांतून निमंत्रणे वाढत गेली. आज त्यांच्या निवेदनात आवाज, शब्दफेकीतील नेमकेपणा,  आणि अभ्यासाची जोड असल्यामुळे  प्रत्येक कार्यक्रम अधिक दर्जेदार आणि श्रवणीय ठरतो.
यश मिळूनही त्यांनी आपल्या मुळांशी नाळ तुटू दिलेली नाही. आजही ते आपल्या पारंपरिक लॉन्ड्री व्यवसायाशी जोडलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती कोमल नवले या कोर्टी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांना दोनच कन्या आहेत. मोठी श्रावणी पाचवीला तर शिवण्या  दुसरीला आहे.आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाची साथ त्यांना सतत नवी ऊर्जा देत असते.
सचिन नवले यांची ही केवळ एका निवेदकाची कथा नाहीतर एका जिद्दीची व स्वप्नपुर्तीची कथा आहे. आज पर्यंत त्यांना निवेदन क्षेत्रातील…… हे पुरस्कार  मिळाले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…!


डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न 9011355389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!