करमाळ्यात मुस्लिम वधू-वर सूचक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा (प्रतिनिधी) : मुस्लिम सोशल वेल्फेअर फाऊंडेशन, मस्जिद ए आयेशा नालबंद नगर करमाळा आणि हाजी महंमद इसहाक फराश फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नालबंद मंगल कार्यालय येथे मुस्लिम वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २८ वधू-वरांनी नोंदणी केली.

मेळाव्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभुराजे जगताप व करमाळा नगराध्यक्ष संजय सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक सचिन घोलप, नगरसेवक प्रशांत ढाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मौलाना सय्यदअली मुजावर यांनी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुस्लिम समाजासाठी वधू-वर सूचक मेळाव्यांचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभुराजे जगताप म्हणाले, “हाजी महंमद इसहाक फराश फाऊंडेशन, पुणे यांनी करमाळ्यात असा उपयुक्त मेळावा आयोजित करून मुस्लिम समाजाला एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. समाजातील पालकांनी व युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा.”
यावेळी हाजी अल्ताफशेठ तांबोळी तसेच दलित सेनेचे लक्ष्मण भोसले यांनीही मनोगत व्यक्त करून अशा उपक्रमांचे स्वागत केले.

मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, रहैनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. कलीम काझी, हाजी महंमद शेख, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिस बागवान, पत्रकार नासीरभाई कबीर, इरा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष आजीम मोगल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोहेल पठाण, इंदाज वस्ताद, मौलाना कादर शेख, अफरोज पठाण, शाहरुख पठाण (वडगाव), जुबेर सय्यद व शाहरुख नालबंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार हाजी महंमद इसहाक फराश फाऊंडेशन, पुणेचे अध्यक्ष इन्तेखाब फराश यांनी मानले.

