जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून निषेध; घोषणाबाजी करत आंदोलन

करमाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ करमाळा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले की, लोकशाहीमध्ये मतभेद असणे स्वाभाविक असले तरी टीका करताना सभ्यता, संस्कार आणि राजकीय मर्यादांचे भान राखणे आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवर जाऊन अवमानकारक भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारी बाब नसल्याचे त्यांनी सांगितले.

जयकुमार गोरे यांनी ग्रामीण विकास, जनकल्याण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले असून, अशा विकासाभिमुख नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन करण्यात येणारी टीका भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहन करणार नाहीत. भविष्यातही अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये झाल्यास त्यास लोकशाही मार्गाने तीव्र उत्तर दिले जाईल, असा इशाराही गणेश चिवटे यांनी दिला.
यावेळी भाजपा करमाळा शहर मंडळ अध्यक्ष काकासाहेब सरडे, नगरसेवक रामभाऊ ढाणे, विजय घोलप, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब देवकर, बंडू शिंदे, सोमनाथ घाडगे, हर्षद गाडे, नवनाथ नाळे, नानासाहेब अनारसे, समाधान कांबळे, संजय ढेरे, जयंत काळे पाटील, गणेश महाडिक, रणजीत पवार, राजेश पाटील, गोकुळ मुरुमकर, हनुमंत रणदिवे, दीपक गायकवाड, सागर सरडे, विश्वनाथ ढेरे, अशोक मोरे, संजय दुर्गुळे, संजय किरवे, तात्यासाहेब शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


