केम मंडळ अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा – प्रहार संघटनेची तहसीलदारांकडे मागणी

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : केम (ता. करमाळा) मंडळ येथे कार्यरत असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या…

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : केम (ता. करमाळा) मंडळ येथे कार्यरत असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी व नाराजी व्यक्त होत असल्याने संबंधित मंडळ अधिकाऱ्यांची प्रशासकीय कारणास्तव तातडीने बदली करून त्यांच्या जागी नवीन मंडळ अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी प्रहार संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी तहसीलदार, करमाळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, केम मंडळाअंतर्गत ८ गावे येत असून महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना मंडळ अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क साधावा लागतो. मात्र, कार्यालयीन उपस्थितीबाबत वारंवार अडचणी येत असून अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत.

फेरफार नोंदी, वारस नोंदी, जमिनीशी संबंधित कामे, पंचनामे, शासकीय पत्रव्यवहार व इतर महसूल विषयक कामांमध्ये विलंब होत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाया जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीची, प्रलंबित कामांची व प्राप्त तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच संबंधित मंडळ अधिकाऱ्यांची नियमानुसार तातडीने बदली करून केम मंडळासाठी नवीन व नियमितपणे कार्यालयीन कामकाज पाहणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि ८ गावांतील प्रलंबित महसूल कामे विशेष मोहीम राबवून तातडीने निकाली काढावीत, अशी मागणीही प्रहार संघटनेने केली आहे. “सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा वेळेत व पारदर्शकपणे मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी,” अशी मागणी संदीप तळेकर, तालुकाध्यक्ष, प्रहार संघटना, करमाळा तालुका यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!