
करमाळा(दि.९): सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज अंतर्गत करमाळा शहरातील महात्मा फुले पुतळा ते शासकीय विश्रामगृह (सात विहीर) या मार्गावरील सुमारे १ कोटी २४ लाख रुपये खर्चाच्या रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या कामात दुय्यम ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असून कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे तालुका अध्यक्ष विशाल परदेशी यांनी केला आहे. या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गुणवत्ता तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा फेडरेशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही परदेशी यांनी दिला आहे.

परदेशी यांनी याबाबत प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करत रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत :
- कामाच्या गुणवत्ता तपासणीसाठी १५ दिवसांच्या आत फील्ड लॅब उभारणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात फील्ड लॅबची व्यवस्था न करताच काम सुरू करण्यात आले आहे.
- काँक्रीट व खडीच्या गुणवत्तेबाबत शंका असून काँक्रीटमध्ये माती मिश्रित साहित्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
- योग्य पद्धतीने रोलिंग व दाब न देता घाईघाईने खडीकरण करण्यात आले आहे.
- संबंधित उपअभियंता व शाखा अभियंता यांच्या पुरेशा देखरेखीअभावी काम मनमानी पद्धतीने सुरू असल्याचे म्हटले आहे.
- या मार्गाचे काम प्रत्यक्ष काम घेतलेल्या ठेकेदाराऐवजी अनुभव नसलेल्या दुय्यम ठेकेदारामार्फत केले जात आहे.
- रस्ता कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना फलक, रेडियम इंडिकेटर्स व दिशादर्शक व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अडचणी निर्माण होऊन अपघाताचा धोका संभवतो.
- कार्यादेशानुसार काम बारा महिन्यांत पूर्ण करणे अपेक्षित असतानाही निर्धारित कालावधीत काम पूर्ण झालेले नसल्याने कामाच्या प्रगतीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

शहरातील शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते तसेच एसटी बसेस आणि जड वाहनांच्या वाहतुकीसाठी हा शहराबाहेरील रस्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे
सदर कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच दक्षता व गुणवत्ता नियंत्रण पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन निष्पक्ष तपासणी करावी. कामात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करून दर्जेदार काम करून घ्यावे, अन्यथा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील. त्यानंतरही दखल न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विशाल परदेशी व अन्य नागरिकांनी दिला आहे.


