संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे तत्काळ मंजूर करण्याची मागणी -

संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे तत्काळ मंजूर करण्याची मागणी

0
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देताना राजाभाऊ कदम व बहुजन संघर्ष सेनेचे कार्यकर्ते.

केम(संजय जाधव): संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे मागील चार महिन्यांपासून मंजूर झालेली नसल्याने ती तत्काळ मंजूर करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी दिला.

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यात मंजूर झाली होती. त्यानंतर मागील चार महिन्यांपासून नवीन प्रकरणांना मंजुरी मिळालेली नसून अनेक अर्जदार मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. एप्रिल महिन्यापासून ऑनलाइन पद्धतीने दाखल केलेली प्रकरणे ऑनलाइन सेंटरवरून माघारी घेऊन ती ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालयात दाखल करण्याच्या सूचना संजय गांधी शाखेतील अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप कदम यांनी केला. त्यामुळे अर्जदारांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले असून तहसील कार्यालयाचे वारंवार हेलपाटे मारावे लागले.



आता अर्जदारांनी सर्व अर्ज ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालयात दाखल केले आहेत. ही प्रकरणे १५ ऑगस्टपर्यंत मंजूर करावीत, अशी मागणी कदम यांनी केली. या योजनेचे लाभार्थी प्रामुख्याने ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध तसेच विधवा महिला आहेत. अशा लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयात ये-जा करणे अत्यंत अडचणीचे असल्याने प्रशासनाने त्यांच्या अडचणींचा विचार करून प्रकरणांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.



१५ ऑगस्टपर्यंत प्रकरणांना मंजुरी न मिळाल्यास बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजाभाऊ कदम यांनी दिला.

याबाबतचे निवेदन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देण्यात आले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री तसेच समाजकल्याण मंत्री यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी आदिनाथ कारखान्याचे संचालक रामेश्वर तळेकर, रामभाऊ नलवडे, महेश पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!