
करमाळा(प्रतिनिधी): प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विविध विद्यार्थी क्लबचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे डॉ. गणेश करे-पाटील व डॉ. प्रचिती पुंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व विविध विद्यार्थी क्लबचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह नेतृत्वगुणांना व स्पर्धा परीक्षांच्या तयारीला चालना मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

डॉ. गणेश करे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना नोकरी आणि करिअर यातील मूलभूत फरक समजावून सांगत विविध उदाहरणे, प्रेरणादायी प्रसंग आणि कवितांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रेरित केले. यशस्वी करिअरसाठी ध्येय निश्चिती, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
डॉ. प्रचिती पुंडे यांनी ‘सबकॉन्शस माईंड’चा प्रभावी वापर करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही मान्यवरांनी यावेळी आपले स्वानुभव कथन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
याच प्रसंगी डॉ. गणेश करे-पाटील यांनी महाविद्यालयास दिलेल्या वॉटर प्युरिफायरचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने डॉ. करे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व स्पष्ट करत यशासाठी कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच महाविद्यालयात सुरू करण्यात आलेले विविध विद्यार्थी क्लब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रविण देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या समन्वयक डॉ. मंजुश्री झगरे यांनी केले, तर आभार प्रा. नितीन पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.


