
चिमुकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आईनेही घेतली विहिरीत उडी; काही तासांच्या शोधमोहीमेनंतर दोघींचे मृतदेह बाहेर काढले
करमाळा : वांगी नं 1 (ता.करमाळा) परिसरातील लोकविकास डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जाधव वस्ती येथे शुक्रवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत मायलेकींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शिल्पा सागर जाधव (वय २८ वर्षे) आणि त्यांची चिमुकली मुलगी ऋतुजा सागर जाधव (वय २ वर्षे) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिल्पा जाधव यांचे पती सागर जाधव हे मोबाईलचे दुकान चालवित असून, शुक्रवारी सकाळी ते टेंभुर्णी येथे औषध आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, शिल्पा यांच्या सासू शेतात कामावर गेल्या होत्या. सासरे खंडेराव जाधव हे पक्षाघातामुळे आजारी असल्याने घरातच होते. दुपारी साडेदीडच्या सुमारास घरातील इतर सदस्य जेवणासाठी आल्यानंतर शिल्पा आणि ऋतुजा घरात दिसून आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी तसेच नातेवाईकांनी दोघींचा घराच्या आजूबाजूला शोध सुरू केला.
शोध घेत असताना चिमुकली ऋतुजाची चप्पल विहिरीत तरंगताना आढळून आली. त्यामुळे ती विहिरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर गावातील युवकांच्या मदतीने विहिरीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. विहिरीत पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने विद्युत मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसण्यास सुरुवात करण्यात आली. पाणी कमी झाल्यानंतर युवकांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता प्रथम चिमुकली ऋतुजाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आणखी शोध घेतल्यानंतर काही वेळाने शिल्पा जाधव यांचाही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वांगी नंबर एक व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मायलेकींच्या मृत्यूने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू होती.




