करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये चिमुकल्यांसाठी आधार नोंदणीची सुविधा

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील पालकांसाठी दिलासादायक बातमी असून, आता लहान बाळांचे आधार कार्ड काढण्याची सुविधा करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नवजात बालकांचे आधार नोंदणी करण्यासाठी पालकांना दूरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

लहान बाळाचे आधार कार्ड काढण्यासाठी पालकांनी बाळासह करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये उपस्थित राहावे. आधार नोंदणीसाठी बाळाचा QR कोड असलेला जन्म दाखला तसेच आई किंवा वडिलांचे आधार कार्ड आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार पालकांचे मोबाईल व आधारशी संबंधित तपशीलही द्यावे लागतील.
नवीन आधार नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र आधारमधील इतर प्रकारच्या अपडेटसाठी शासनाने निर्धारित केलेले शुल्क लागू राहणार आहे. करमाळा तालुक्यातील पालकांनी आपल्या लहान बाळाचे आधार कार्ड वेळेत काढून घेऊन करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्टमास्टर उदय बंडगर यांनी केले आहे.





