मध्यरात्री महामार्गावर शंभूराजे जगताप ठरले देवदूत- समयसूचकतेने गंभीर जखमीचे वाचले प्राण! - Saptahik Sandesh

मध्यरात्री महामार्गावर शंभूराजे जगताप ठरले देवदूत- समयसूचकतेने गंभीर जखमीचे वाचले प्राण!

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२४ : संकटाच्या काळात अनोळखी व्यक्तीच्या मदतीला धावून जाणे आणि प्रसंगावधान राखून एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणे, हीच खरी माणुसकी आहे. याचा प्रत्यय अहिल्यानगर-करमाळा महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या एका अपघाताच्या घटनेत आला. युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी समयसूचकता दाखवत महामार्गाच्या मधोमध गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या अज्ञात इसमाला तातडीने मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले आणि त्याचे प्राण वाचले.

घरगुती कार्यक्रमासाठी अहिल्यानगर येथे गेलेले शंभूराजे जगताप रात्री उशिरा एकटेच करमाळ्याकडे परतत होते. मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावरील उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाची धडक बसल्याने एक इसम गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या मधोमध रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला.
उड्डाणपुलावरील अंधार आणि भरधाव वेगाने धावणारी वाहने यामुळे जखमी व्यक्तीला आणखी एखाद्या वाहनाची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू होण्याचा धोका निर्माण झाला होता.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच शंभूराजे जगताप यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले वाहन थांबवले. स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता त्यांनी गंभीर जखमी इसमाला महामार्गाच्या मधोमधून सुरक्षितपणे दुभाजकाजवळ हलविले.
यानंतर त्यांनी तत्काळ NHAI च्या १०३३ आपत्कालीन हेल्पलाइनवर तसेच रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंत ते जखमी व्यक्तीजवळच थांबून राहिले. अवघ्या १५ मिनिटांत मदत पोहोचल्यानंतर जखमीला सुरक्षितपणे रुग्णवाहिकेत दाखल करून उपचारासाठी रवाना करण्यात आले. त्यानंतरच शंभूराजे जगताप यांनी आपला पुढील प्रवास सुरू केला.

वेळेत मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे गंभीर जखमी व्यक्तीचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले.
अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची शंभूराजे जगताप यांची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही महामार्गावर अथवा प्रवासादरम्यान अपघातग्रस्त व्यक्ती आढळल्यास त्यांनी स्वतःचा प्रवास बाजूला ठेवून जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली आहे. स्वतःच्या वाहनातून जखमींना मदत करण्याबरोबरच संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून त्यांनी अनेक वेळा मदतीचा हात दिला आहे.
महामार्गावरून अनेक वाहने पुढे जात असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून थांबणे, त्याला सुरक्षित ठिकाणी हलविणे आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्याच्यासोबत राहणे, या त्यांच्या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या घटना निश्चितच शंभूराजे जगताप यांची ‘रिअल हिरो’ म्हणून नवी ओळख निर्माण करणारी ठरली आहे.

error: Content is protected !!