रस्ता करणावरून जातीवाचक शिवीगाळ - Saptahik Sandesh

रस्ता करणावरून जातीवाचक शिवीगाळ

करमाळा / संदेशप्रतिनिधी
करमाळा,ता.२०: निमगाव हवेली येथे शेतातून रस्ता काढण्याच्या वादातून नागनाथ उत्तम वाघमारे यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देवून रस्ता करण्यासाठी ट्रॅक्टर शेतात घालून ऊस पिकाचे नुकसान केल्याची फिर्याद करमाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
यात नागनाथ उत्तम वाघमारे यांनी सुमारे 14 वर्षांपूर्वी निमगाव हवेली मधील जमीन खरेदी केली असून शेती करीत आहेत. सदर जमीन वर्ग-2 स्वरूपाची असल्याने सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव नसून, जमीन त्यांच्या नावावर करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, शेजारील शेतकरी आप्पा वासुदेव शिंदे यांनी शेतात जाण्यासाठी बांधावरून रस्ता मिळावा, अशी मागणी तहसील कार्यालयाकडे केली होती. दि.5 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वाघमारे शेतात गेले असता आप्पा वासुदेव शिंदे, राजेंद्र महिपती रोकडे, संजय येताळा रोकडे रस्ता चरत होते. त्यांना माझ्या शेतात रस्ता करु नका म्हटल्यावर त्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली तसेच जीवे मारण्याची धमकी देवून एका अनोळखी व्यक्तीने ट्रॅक्टर शेतात घालून ऊस पिकाचे नुकसान केले आहे.ट्रॅक्टर अडविण्याचा प्रयत्न केला असता आप्पा शिंदे, संजय रोकडे व राजेंद्र रोकडे यांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली त्यानंतर पोलीस ठाण्याकडे जात असताना निळवस्ती, निमगाव येथे सतिश मधुकर निळ यांनी स्कॉर्पिओ वाहनातून उतरून जातीवाचक शिवीगाळ केली आणि धमकी दिली.
या प्रकरणात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

error: Content is protected !!