शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी शिक्षक सेनेचे आमरण उपोषण

केम (संजय जाधव): सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सेनेच्या वतीने गुरुवार, ८ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती देताना श्री गुंड म्हणाले की, शिक्षक संघटनेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या विविध निवेदनांना जाणीवपूर्वक उत्तर न देणे, निवेदनांवर कोणतीही कार्यवाही न करणे, संघटनेच्या सभासद शिक्षकांची प्रलंबित शासकीय कामे विनाकारण प्रलंबित ठेवणे तसेच त्यांना मानसिक त्रास होईल अशा पद्धतीने कारवाई करणे, असे आरोप आमच्या संघटनेचे आहेत.
तसेच वेतन बंद असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न देता संबंधित शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या वेतनापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोपही शिक्षक सेनेने केला आहे. या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद, पूनम गेटसमोर ८ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबतचे निवेदन शिक्षक सेनेच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक पुणे तसेच सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर यांना देण्यात आले आहे.
