दुष्काळाचा करमाळा तालुक्यात पहिला बळी-करंजे येथे संतोष लावंड यांची गळफास घेऊन आत्महत्या - Saptahik Sandesh

दुष्काळाचा करमाळा तालुक्यात पहिला बळी-
करंजे येथे संतोष लावंड यांची गळफास घेऊन आत्महत्या

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.८ :  तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळजन्य परिस्थितीला कंटाळून करंजे येथील संतोष सिताराम लावंड (वय ५०) या शेतकऱ्याने आज ( ता.८) गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत दुष्काळ पडल्याने तसेच पिकांना पाणी नसल्याने आत्महत्या करीत असल्याचा मजकूर आढळून आल्याचे समजते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील दुष्काळाचा हा पहिला बळी असल्याची चर्चा असून, या घटनेने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती दुपारी १.५० वाजता करमाळा पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर लावंड यांना तातडीने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टर बंडगर यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस नाईक अश्फाक शेख करीत आहेत.
संतोष लावंड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दुष्काळाच्या झळा तीव्र होत असतानाच शेतकऱ्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे शेतकरी वर्गात तीव्र चिंता व्यक्त होत आहे. या घटनेने करमाळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, लावंड यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

error: Content is protected !!