करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमलाभवानी देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना करण्यात आली. सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न झाली. ‘आई राजा उदो उदो, सदा आनंदीचा उदो उदो’ या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला.
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी मंदिर संस्थानचे विश्वस्त शिरीषकुमार लोणकर आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंदिर संस्थानचे पुजारी दादासाहेब पुजारी यांनी देवीची विधिवत पूजा केली.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. माही डेकोरेशन आणि मराठा मंदिर डेकोरेशन यांच्या वतीने करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य खुलून दिसत आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि देवीच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या धार्मिक सोहळ्यास मंदिर संस्थानचे विश्वस्त, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पुरोहित रविराज पुराणिक, सुशील पुराणिक, मंदिराचे पुजारी बापूराव पुजारी, विजय पुजारी, संदीप पुजारी, जयदीप पुजारी, भारत सोरटे, नारायण सोरटे, अभिमान सोरटे, रामलिंग सोरटे यांच्यासह मंदिरातील मानकरी व सेवेकरी उपस्थित होते.
शारदीय नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो. या नऊ दिवसांत श्री कमलाभवानी देवीच्या दर्शनासाठी करमाळा शहरासह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे नवरात्रोत्सव काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते.
