करमाळ्यात थकीत मालमत्ता करावरील दंडात ५० टक्के सवलत; नागरिकांना मोठा दिलासा

नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
करमाळा | संदेश प्रतिनिधी :
करमाळा नगरपरिषद हद्दीतील थकीत मालमत्ता करधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, थकीत मालमत्ता करावरील दंडामध्ये ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या प्रोत्साहनात्मक अभय योजनेअंतर्गत ही सवलत मिळणार असून, नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
थकीत मालमत्ता कराची वसुली वाढविण्यासोबतच नागरिकांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. यापूर्वी नगरपरिषदेमध्ये थकीत मालमत्ता करावरील दंडापैकी ५० टक्के दंड माफ करण्याबाबत ठराव मंजूर करून त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.
याबाबत माहिती देताना नगराध्यक्षा मोहिनी सावंत म्हणाल्या की, करमाळा शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून अशा अभय योजनेची प्रतीक्षा होती. दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या योजनेमुळे नागरिकांना थकीत करावरील दंडात सवलत मिळणार असून, नगरपरिषदेच्या मूळ कराची वसुली होण्यासही मदत होणार आहे. या कामासाठी उपनगराध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान, थकीत मालमत्ता कर भरून या अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि नगरपरिषदेच्या कर वसुलीस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या निर्णयामुळे करदात्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याने नागरिकांकडून नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड व सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

