पोलीस हवालदार सचिन भस्मे यांचे निधन

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील रहिवासी तथा भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सचिन चंद्रकांत भस्मे (वय ४५) यांचे गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलासह मिरगव्हाण गावावर शोककळा पसरली आहे.
सचिन भस्मे हे सध्या बारामती येथील शासकीय वसाहतीत वास्तव्यास होते. त्यांनी सुरुवातीला दौंड येथे राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) ड्रिल इन्स्ट्रक्टर म्हणून सेवा बजावली होती. त्यानंतर ते भिगवण पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते.
गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बारामती मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
राज्य राखीव पोलीस दलासह महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून सेवा बजावली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भिगवण पोलीस दलातील सहकारी, मित्रपरिवार आणि मिरगव्हाण गावात शोक व्यक्त करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मिरगव्हाण येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.

सचिन भस्मे हे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून परिचित होते. आपल्या सेवाभावी वृत्तीने त्यांनी सहकारी आणि नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पोलीस दलाने एक कर्तव्यनिष्ठ सहकारी गमावला असून, सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक भाऊ, चुलते-चुलती आणि चुलत भाऊ असा परिवार आहे.
जन्मगावाच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता
मिरगव्हाणच्या रस्ता व सांडपाण्याच्या समस्येबाबत सचिन भस्मे यांनी साप्ताहिक संदेशला एकदा माहिती देऊन गावातील समस्येवर आवाज उठवण्यासाठी प्रयत्न केला होता. संबंधित बातमीची लिंक:
अवघ्या ७ किमी रस्ता दुरुस्तीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा; मिरगव्हाण ग्रामस्थांचे दैनंदिन दळणवळण बिकट
