फळझाडांसाठी आयुष्य वाहून घेतलेला अवलिया!
आज 30 ऑक्टोबर 2024, आमचे वडील स्व. गुलाबराव ईश्वर पाटील (आबा) यांची 78 वी जयंती आहे. यानिमित्ताने त्यांच्या काही आठवणी मी या लेखातून जाग्या करत आहे. आबा म्हणजे फळझाडे आणि झाडे लावण्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेला अवलिया. करमाळा-कर्जत रस्त्यावरील भोसे हे आमचे गाव.
आमचे आबा कृषी खात्यामध्ये 1965 साली Traser पदावर जॉईन झाले. सुरुवातीला बाहेर दूरवर नौकरी केली. नंतर 1978 पासून बर्यापैकी करमाळा तालुक्यात केली. आमच्या आजोबांना (कै. ईश्वर आनंदराव पाटील) पण फळझाडे लागवडीचा छंद होता. 1960 साली 30-40 मोठी आंब्याची झाडे बांधावर होती. 4,5 जांभुळ आणि 7,8 चिंचेची झाडे सांभाळून उत्पन्न पण घेत होते. सरदार लखनौ जातीची पेरूची छान चव असणारी झाडे सुद्धा 1965 पासून होती.
पुढे कृषी खात्यामार्फत अनुदान तत्त्वावर 1993 मध्ये 80 चिक्कू, 80 केशर आंबे, 160 डाळिंब शेतात लावणारे आबा पंचक्रोशीतील पहिले शेतकरी होते. तिथून त्यांनी फळझाडे वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि छोटी रोपवाटिका सुरू केली. त्यामधे ते केशर आंबा कलमे आणि इतर सर्व प्रकारच्या फळझाडे यांची रोपे तयार करत. तसेच आवडीने, उत्साहाने न थकता लागवड करण्याविषयी सर्व माहिती देत असत.
खऱ्या अर्थाने कृषी विभागाची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आबा मार्फत शक्य झाले. त्यांची शेती प्रयोगशाळा आणि demo plot बनली. बर्याच जणांनी प्रेरणा घेऊन पुढे फळझाडे आणि फळबागा वाढवल्या. गावामधे अनेकांना कलम करणे काय असते ते समजले. आज बर्याच जणांना केशर आंबा चव चाखायला मिळाली.
आबांनी मोबदला किती मिळेल याची अपेक्षा न करता बर्याच जणांच्या घरी, शेतात जाऊन कलमे करून दिली. आज त्यांचे हात लागलेली अनेक फळझाडे लोकांना चांगले उत्पादन आणि घरी खाण्यासाठी भरपूर फळे देत आहेत. त्यांच्यामुळे लोकांचा फळझाडे लावण्याचा कल वाढला. आबांनी फळबागा लागवडीचे महत्त्व पटवून दिले. स्वतः च्या शेतात स्वखर्चाने सुद्धा जलसंधारणाची कामे केली. पाणीसाठा वाढवला. नंतर पुढे 2000 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि फळबागा आणि रोपवाटिका मध्ये स्वतःला झोकून दिले. 2020 मध्ये आजारपणात निधन झाले. आबांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
✍️ दिलीप गुलाबराव पाटील, भोसे/बारामती