केम येथील पुरातन व प्रसिद्ध उत्तरेश्वर देवस्थान - Saptahik Sandesh

केम येथील पुरातन व प्रसिद्ध उत्तरेश्वर देवस्थान

केम/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील सर्वश्रुत केम येथील श्री उत्तरेश्वर मंदिर हेमाडपंथी प्राचीन मंदिरात एक स्वयंभू लिंग आहे जागृत देवस्थान व भक्तांना पावन होत असल्याने श्रावण महिन्यात व अधिकमास या महिन्यात भक्तांनी मंदिर अक्षरशः फुलून जाते. केम नगरीतील शिवलिंग हे स्वयंभू व जागृत असून श्री उत्तेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिराला पुरातन महत्व लाभलेले आहे. ग्रामदैवत श्री उत्तरेश्वराचे श्रद्धेने व सद्भावनेने पूजन व स्मरण केले असता भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या नगरीचे केम हे क्षेम राजाच्या क्षेमवती या नगराच्या अपभ्रंशीत नावावरून प्राप्त झाले आहे.

नगरा नाम केमवती पडले l क्षेमराजे ग्राम वसविले ll क्षेम नगर बोलता वहिले l केम ऐसे बोलती… ( संदर्भ श्री उत्तरेश्वर महात्म्य

– श्री भास्कर बुवा साकतकर.. अध्याय ४…ओवी ७

सप्तलिंग उत्पत्ती – उज्जैन नगरीच्या साधूने सांगितल्यानुसार राजा क्षेम पूर्व जन्माच्या शापातून मुक्त होण्यासाठी नगर सोडून अरण्यात हिंडत असता केम मधील तीर्थकुंडाजवळ बारवाच्या जवळ आला व येथील तीर्थाच्या स्पर्शाने शापमुक्त झाला.

उत्तरेश्वर मंदिरातील बारव

सप्तलिंग प्राप्त झाले एकलिंग कुंडासमीप स्थापिले l उत्तरेकडे मंदिर उभारिले नाम पडिले उत्तरेश्वर ||

– अध्याय ४… ओवी 9

त्या तीर्थकुंडात राजाला सप्तलिंगे सापडली त्या लिंगांची राजाने नगरा भोवती स्थापना करून देवालये उभारली कुंडाजवळ उत्तर दिशेला यातील एका लिंगाची स्थापना केली यालाच उत्तरेश्वर असे नाव पडले अशाच प्रकारे दक्षिण दिशेला दक्षिणेश्वर…मध्यभागी मध्यमेश्वर… घुटकेश्वर…केमेश्वर…रामेश्वर…व शंकरेश्वर अशा सप्तलिंगाची स्थापना क्षेम राजाने केली. (संदर्भ श्री उत्तरेश्वर महात्म्य… भास्कर बुवा साकतकर )

केम गावची जगभर ओळख कुंकावरून आहे केमच्या कुंकवाचा इतिहास प्राचीन आहे क्षेम राजा व्याधीयुक्त झाल्यानंतर त्याच्या राणीने आदीमाया पर्वती मातेची दर्शनासाठी प्रार्थना केली राणी नित्य नियमाने श्री उत्तरेश्वर देवालयात पार्वती मातेचा जप करीत असे एके दिवशी श्री उत्तरेश्वराचा गाभारा तेजाने उजळला चहूकडे सुगंध पसरला व पार्वती मातेने साक्षात राणीला दर्शन दिले राणीचे देहभान हरपले राणीच्या डोळ्यात अश्रू येऊन राणीने पार्वती मातेचे पाय धरले व आपले हात जोडले त्यावेळी पार्वती मातेने राणीला सौभाग्याचा आशीर्वाद देत राणीच्या कपाळाला कुंकू लावले त्यावेळी राणीच्या हातात कुंकवाची ओंजळ आशीर्वादाने भरून सांडू लागली.

कुंकवाचे केम

आशीर्वाद देती झाली l कुंकुम तिलक लाविला भाळी l राणीची भरली आंजुळी l उपरांडुनी सांडे कुंकू ll१२ll पार्वती म्हणे राणीशी l सौभाग्य कुंकू ये भूमिशी l म्या सांडती केम ग्रामसी l कुंकुमे ग्रामा प्रसिद्धी ll१३ll

– अध्याय ५ वा ओवी १२-१३

त्यावेळी पार्वती माता राणीला म्हणाल्या सौभाग्याचे प्रतीक असलेले कुंकू या भूमीवर माझ्या आशीर्वादाने सांडले असल्यामुळे हे गाव देशभर कुंकवासाठी प्रसिद्ध होईल तेव्हापासून कुंकवाची निर्मिती व व्यापारासाठी केम गाव प्रसिद्ध असून आजही ही परंपरा केम गावात मोठ्या प्रमाणात जपली आहे पिढयान, पिढ्या हा व्यवसाय या ठिकाणी चालत आला आहे.

केम येथे लहान मोठे २५ कुंकू कारखाने आहेत, परंतु आता दळणवळण अभावी येथील कारखाने शहराकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत.या ठिकाणी रेल्वे गेटवर उड्डाण पूल करावा अशी मागणी येथील कुंकू कारखानदारांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!