लालपरीचा पूर्वीचा रुबाब आज राहिला नाही!
खूप वर्षानंतर मागच्या आठवड्यात लाल परी मधून प्रवास करण्याचा योग आला. काही वर्षांपूर्वीचा लाल परीचा जो रुबाब होता तो आज राहिला नाही. बाहेरून दिसणारी लाल परी आज पांढऱ्या, हिरव्या, पिवळ्या रंगांमध्ये रूपांतरीत झाली आहे. बाहेरून जशी रूपांतरित झाली आहे तशीच आतूनही रूपांतरीत होण्याची गरज होती, परंतु तीचे आजचे रूप हे खूप विदारक आहे.
दररोज कुठे ना कुठे एसटीच्या प्रवासात या ना त्या कारणाने एसटी बंद पडण्याचे सत्र चालूच असते. कुठे टायर पंक्चर होतो तर कुठे गीअरबॉक्सला प्रॉब्लेम येतो. नशीब त्या दिवशी हे असे काही घडले नाही तरी त्या दिवशी करमाळा बस स्थानकातून निघालेली लाल परी 160 किलोमीटर अंतर पार करून पुण्यात पोहोचण्यासाठी तिला तब्बल सहा तासाचा कालावधी लागला. प्रवास करताना लालपरीचे होणारे हाल पाहवले नाहीत.
तिचा प्रवास चालू असताना तिला मधेच पावसाने गाठले. तुटलेल्या खिडक्यांमधून येणाऱ्या पावसाने सर्व प्रवासी थंड झाले होते. समोर असणाऱ्या भल्या मोठ्या काचेवरती हातभर लांबीचा व्हायपर वितभर वर खाली करत फक्त चालकाला दिसेल एवढीच काच स्वच्छ करत होता. चालकही अधून मधून आतील बाजूने काचेवर जमा झालेले बाष्प कागदाच्या मदतीने स्वच्छ करत होता. जर तिच्या आवाजाबद्दल बोलायचे झाले तर एवढा कर्णकर्कश होता. असं वाटत होतं की लगेच स्फोट होतो की काय? तिचं बोनेट पहाल तर तिचं वरील आवरण हे गायब झालेलं. जणूकाही त्याचं पोस्टमार्टम करून उघडे ठेवले आहे. पुढील बाजूस असलेला लाईट हा तर एखाद्या कंदीलाच्या उजेडामध्ये प्रवास करावा याच पद्धतीचा. आणि वेग म्हणाल तर कासवाची गती. रिक्षालाही तिने कधीच मागे टाकले नाही उलट रिक्षा तिला मागे टाकून पुढे निघून जात होती. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की,
एक होती लालपरी,
– अशोक वीर, करमाळा
करायला निघाली सवारी.
वाटेतच पावसाने तीला गाठले,
तुटलेल्या खिडक्यातून साऱ्यांना भिजवून टाकले.
भल्यामोठ्या काचेवर हातभर व्हायपर,
तोही फिरत होता खालीवर विथभर.
आवाजाने करून टाकले बधीर कान,
वाहकाने टेकली स्वतःच्याच मांडीवर मान.
१६० कि मी चे अंतर कापायला लागले सहा तास,
नाकात बसला होता उलटीचा उग्र वास.
कोणी तरी द्या रे तीला मदतीचा हात,
नाही तर होऊन जाईल तीच बरबाद.