कहाँ तुम चले गए ..!
दि. 30 जुलै 2000 चा तो दिवस समस्त कोर्टी वासियांसाठी आणि तालुका वास यासाठी आंधारमय , दुख:दायक, दुखा:चा पहाड कोसळविणारा ठरला .याच दिवशी कोर्टी गाव पोरके झाले. संपूर्ण जिल्ह्याचे लाडके समाजभुषण अभंग दादा यांचे दुःखद निधन ही बातमी पंचक्रोशीतील लोकांच्या काळजाचा ठाव घेणारी ठरली. काशिनाथ दादा गेले ही भावना समस्त गावकऱ्यांना पचवणे जड जात होते.
खरं तर ‘दादा’ म्हंजे एक वेगळंच रसायान. एक संघर्षयात्री, एक हरहुनारी व्यक्तीमत्व ,करुनेचा सागर,लोहपुरुष पण तेवढाच हळवा,संवेदनशील व अध्यात्माची जाण असणारे व्यक्तिमत्व. स्वर्गीय काशिनाथ एकनाथ अभंग उर्फ अभंग दादा त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1925 रोजी झाला. लहानपणापासून ते अतिशय जिद्दी आणि तल्लक बुद्धिमत्तेचे होते. असं म्हणतात की,जेंव्हा निसर्गाला काही अद्भुत किंवा आगळेवेगळे घडवायचे असते तेव्हा तो अशी सर्जनशील व कार्यतत्पर माणसे जन्माला घालतो. क्रांतीची व परिवर्तनाची भाषा बोलणारे एक गोष्ट कायम लक्षात घ्यावी की क्रांती हे काही येड्या गबाळ्याचे काम नाही. परिवर्तन घडवताना मन मनगट व मस्तकात नेहमी समाजसेवेची ज्योत तेवत ठेवावी लागते. ही समाजसेवेची आणि परिवर्तनाची भाषा ज्यांनी करमाळा तालुक्याला शिकवली व जगून दाखवली ते आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे स्मृतीशेष अभंग दादा.
अभंग दादा यांनी गावातील तालुक्यातील गोरगरीब बहुजन वंचित सर्व घटकांना एकत्रित घेऊन विकासाचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला.दादांचे शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत. पण दादांना मोडी लिपी खूप चांगल्या प्रकारे ज्ञात होती.
त्यामुळेच तारुण्यात येताच समाजकारणात त्यायोगे राजकारणात प्रवेश करत त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक शाळेला उत्कृष्ट वर्ग खोल्या बांधून घेतल्या. त्या काळातील जिल्ह्याचे नेते कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या माध्यमातून कोर्टी गावातील वाड्यावर प्राथमिक शाळा स्थापन करण्याचे मोठे कार्य अभंग दादांनी केले. कोर्टी हे पश्चिम भागातील तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण गरज ओळखून त्यांनी कोर्टी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणले. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बँक ऑफ इंडिया आर्थिक गरजा भागविणाऱ्या मोठ्या बँका स्थापन करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श ठेवून शैक्षणिक विकास करण्याचे स्वप्न अभंग दादा उराशी बाळगून होते. त्यातूनच त्यांनी कोर्टी सारख्या तत्कालीन खेडेगावांमध्ये शिक्षणाचे एक रोपटे 1964साली लावले. नाव दिले महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे. छत्रपती शिवाजी हायस्कूल कोर्टी. इवलेसे रोप लाविलीये द्वारी, त्याचा वेरू गेला गगनावरी… या उक्तीप्रमाणे,आज त्याच रोपट्याचे एक वटवृक्ष झाल्याचे दिसून येते.या विद्यालयाच्या ज्ञानसागरातून अनेक उत्कृष्ट विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर वकील प्राध्यापक व्याख्याते तयार झाली त्या छत्रपती शिवाजी विद्यालयाची स्थापना त्यांनी 1964 रोजी केली. पुतळा काळातील गोरगरिबांच्या दारामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचे मोठे कार्य करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेला.
राजकारण हे राजकारण न ठेवता समाजकारण हे खरे राजकारण आणि राजकारण हे खरे समाजकारण या दोन गोष्टीची कधीही गल्लत होऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कोर्टी गावचे नाव सोलापूर जिल्ह्यात शिखरावर नेऊन ठेवले आहे.
जशी कणसात कणसं असतात दाणेदार, तशी माणसात माणसं असतात बाणेदार. हाच बाणेदारपणा आदरणीय अभंग दादा यांनी निर्भीडपणे दाखवत शैक्षणिक व सामाजिक वैभव मिळवून देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या विकासासोबतच सामाजिक सुधारणेचा संकल्प व निर्धार मनी बांधला. दादांना समाजकारनचं वेड हे पहिल्यापासुनच. त्याच वेडातून दादांनी राजकारणात प्रवेश केला.तिथेही ठसा उमटवायला सुरुवात केली.ग्रामपंचायत कोर्टीचे गोविंदराव जाधव यांच्या नंतर दुसरे सरपंच पद भूषविले तेही विक्रमी 17 वर्षे. हेच सरपंच पद भूषविता भूसविता गावचे काशिनाथ अभंग नावाचे हे हा लढवय्ये व्यक्तिमत्व तालुक्याचे दादा कधी झाले हे कळलेच नाही.
1973 साली ते करमाळा पंचायत समितीचे सभापती झाले. करमाळा पंचायत समितीच्या दुसरे सभापती म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. तालुक्यातील स्वर्गीय गोविंद बापू पाटील, जिल्ह्याचे नेते कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील, आजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते दिगंबर रावजी बागल, माजी आमदार नारायण आबा पाटील या सर्व राजकीय नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते आणि याच संबंधाच्या आधारावर त्यांनी कोर्टी गावामध्ये विकासगंगा सतत वाहती ठेवली. त्यामुळेच ते सतरा वर्ष कोर्टी गावचे सरपंच राहिले एक राजकिय वलय त्यांच्याभोवती तयार झाले.हे सर्व असतानादेखील समाजातील विचाराने व प्रतिष्टेने अतीश्रीमंत असा हा मानुस सतत जमिनीवर राहिला.
अभंग दादा…गावातील एक दैदीप्यमान व्यक्तिमत्व ज्यांनी कोर्टी गावाला शैक्षणिक,आरोग्य विषयक, बँका अशा विविध सुविधा मिळवून दिल्या. हे सर्व करत असताना राजकिय पटलावरही सोलापूर जिल्ह्यातील विकासपुरुष स्वर्गीय नामदेवराव जगताप, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील घराण्याशी त्यांचे घणिष्ट राजकिय संबंध जुळून आले. 1970 मध्ये प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर भूविकास बँकेचे संचालक पदही भूषवले. कोर्टी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पशुवैद्यकीय केंद्र त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया आणि डीसीसी बँक त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सुरू झाली. राजकीय पक्ष कोणताही असो समस्त समाज आपल्या छायेखाली धरताना समाजकार्य या एकच उद्देशाने प्रेरित होऊन सतत बारा महिने (चोवीस तास) समाजासाठी उपलब्ध असणारे धडाडीचे नेतृत्व अभंग दादा यांच्या रूपाने करमाळा करांना त्या काळात मिळाले. तसं पाहिलं तर राजकीय पुढारी म्हटलं की गट तट पक्ष राजकारण हे सर्व आलेच परंतु राजकारण हे राजकारणापुरते, एकदा राजकारण संपले की गावातील तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे, मी त्यांचा प्रतिनिधी म्हणजे मी त्यांचे देणे लागतो या ध्येयाने झपाटून जात तमाम गावकरी व तालुका वासियांच्या अडचणींना धावून जाण्याचा कायम प्रयत्न केला.त्यांचा हाच राजकिय वारसा पुढे त्यांचे पुत्र भरतरीनाथ आप्पा, स्वर्गीय अभंग सर, आणि सून अंजनाताई यांनीही नेटाने पुढे नेला.
त्याचबरोबर शैक्षणिक वारसा जोपासताना त्यांचे जेष्ठ पुत्र आदिनाथ अभंग यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक पदही भूषवले त्याचबरोबर त्यांची सध्याची पिढी डॉक्टर महेश अभंग, एडवोकेट अनुप अभंग आणि मंगेश अभंग सर यांच्या रूपाने हा वारसा नेटाने पुढे चालवते आहे..
एकीकडे कुटुंबाची जबाबदारी ,तर दुसरीकडे सामाजिक व राजकीय व्यस्तता.आणि याच दगदगीमुळे दादांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. सामाजिक व राजकीय दगदग यामुळे आजार बळावत गेला…. आणि अचानक 30जुलै 2000च्या रोजी दादा अत्यवस्थ झाले.डॉक्टरांच्या चमुने शर्थीचे प्रयत्न केले परंतु समाजहितासाठी झगडणारा,झुंजनारा हा ‘अर्जुन’ जीवनाची लढाई मात्र हरला.एका क्रांतीपर्वाचा अस्त झाला.लोकांच्या जीवनात असंख्य दिपज्योती लावनारा एक दीपक एका निवांत मुक्कामी निघुन गेला, सर्व गावाला पोरकं,करुन….!!!!
कंठात आज माझ्या गाणे वीरून गेले या लाडक्या दादांचे जीवन सरुन गेले.!
✍️प्रा. राहुलकुमार महानंदा सुरेश चव्हाण, कोर्टी, ता.करमाळा, मो.9130205830
जरी लोपली ही मुर्ती ,किर्ती जिवंत आहे ;
किती जीवांस दादा ,मानुस करुन गेले.!
नाही भिती कुनाची ,वक्तव्य ऐसे होते,
लाखात दादा माझे भारी ठरुन गेले.!
आलो पदी मी तुमच्या घेउन पुष्पमाला,
श्रद्धांजली ही तुम्हा ,जे उद्धरुन गेले.!