करमाळ्याच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे होणार संवर्धन – शासनाकडून २ कोटी निधी मंजूर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी २ कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना आ. शिंदे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा या तालुक्यांबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम आदी भागावरती राजे रावरंभा निंबाळकर यांची सत्ता होती. करमाळ्यातील कमलादेवीचे मंदिर तसेच भुईकोट किल्ला हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे.करमाळा हे तालुक्याचे ठिकाण असून त्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक वारसाचे जतन व संवर्धन करणे हे आपले काम आहे. त्यानुसार आपण करमाळा तालुक्यातील कमला भवानी मंदिराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून ४ कोटी निधी मंजूर केला. त्याचप्रमाणे भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी २ कोटी निधी मंजूर केलेला आहे. सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या प्रकारच्या बांधकामाचा सामावेश आहे. किल्ल्याच्या कामासाठी निधीस मंजुरी मिळाली असल्याने लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल, तसेच या कामामुळे किल्ल्यास पुर्नवैभव लाभणार असून करमाळा शहाराच्या विकासात आणखीन भर पडण्यास मदत होणार आहे.
करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी आपण १०० कोटीपेक्षा अधिक निधी दिला – आ.शिंदे
करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडणेसाठी आत्तापर्यंत आपण करमाळा नगरपरिषद इमारत बांधकाम करणे ,सांस्कृतिक सभागृह बांधणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे या कामासाठी १० कोटी निधी, जिन मैदान येथील क्रीडा संकुल विकासासाठी ६ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरातील रस्ते विकास, दफनभूमी सुधारणा आदी कामांसाठी १० कोटी, करमाळा उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी २५ कोटी ,उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी १८ कोटी, सहकारी संस्था निबंधक कार्यालयासाठी २ कोटी, करमाळा शहरातील प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील रस्ते विकासासाठी १ कोटी,निधी मंजूर केलेला आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले व त्याला यशही मिळाले आहे. करमाळा शहरातील सर्व प्रशासकीय इमारती एका ठिकाणी आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीकरता २५ कोटी निधीची मागणी केलेली आहे.
दुर्गसेवकांच्या प्रयत्नांना यश
करमाळा शहराला एक ऐतिहासिक वारसा असून या शहराचा इतिहास जर जपायचा असेल तर आपल्याला येथील ऐतिहासिक स्थळांना जपायला हवे हा विचार घेऊन स्थापन करण्यात आलेल्या ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपच्या वतीने ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपने करमाळा भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी विविध मोहीमा आयोजित केल्या होत्या. प्रत्येक रविवारी युवकांनी एकत्र हातात फावडे, कोयता, कुऱ्हाड, पाट्या हातात घेऊन बुरुजावर, तटबंदीवर उगवलेली छोटी-मोठी काटेरी झाडे झुडुपे तोडली. गवतावर औषध फवारणी करण्यात आली. वुडकटर मशिनच्या साहाय्याने बुरुजावर उगवलेली मोठी झाडे तोडली. फावड्याने स्वच्छता केली.
‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपने ऐतिहासिक ठेवा जतवणुक करण्याच्या मोहिमेमुळे सर्व तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी किल्ल्याच्या संवर्धनासाठी ज्योत पेटविली होती. आता या किल्ल्याच्या संवर्धनासाठी २ कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले असल्याने दुर्गसेवकांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
- करमाळा भुईकोट किल्ल्यावरील स्वच्छता मोहिम उत्स्फूर्तपणे संपन्न
- काटेरी झुडुपे तोडत ‘दुर्गसेवक करमाळाकर’ यांची दुसरी स्वच्छता मोहीम संपन्न



Karmala urban Bank | Karmala | Solapur