‘आशय हा कवितेचा आत्मा असतो : कवयत्री वेदपाठ
करमाळा :’आशय हा कवितेचा आत्मा असतो’ या कविता जीवन घडवतात आणि दिशा देतात. अशाच कवितांनी करमाळ्याला येण्यासाठी माझ्यासाठी रस्ता बनवला आहे; असे भावनिक विचार “बुधभूषण पुरस्कार प्राप्त” कवियत्री प्राजक्ता वेदपाठक यांनी मांडले.
करमाळा तालुका साहित्य मंडळाच्या वतीने ‘तु चिरंतन कविता माझी’ या प्राजक्ता वेदपाठक यांच्या कवितासंग्रहास राज्यस्तरीय ‘बुधभूषण पुरस्कार’ देण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रीमती वेदपाठक बोलत होत्या.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड ,स्त्रीरोग तज्ञ डॉ. कविता कांबळे, साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रकाश लावंड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राजक्ता वेदपाठक म्हणाल्या, की कवितेत यमक अथवा अन्य बाबी महत्वाच्या नसतात. छंदही महत्वाचा नाही. परंतु जो आशय मांडायचा आहे तो परिपूर्ण असावा लागतो. तेव्हाच ती कविता हृदयात आरपार शिरते. कविता ही सहज साधी सोपी नसते. माझ्यावर कोरोनात संकट कोसळले. माझे पती गेले. एवढा मोठा दु:खाचा डोंगर पण मी या कवितेतून सावरले आहे. पुणे सारख्या शहरात मी आयटी क्षेत्रात असताना आज, करमाळ्याचा जो अनुभव आहे तो फार वेगळा आहे. हा अनुभव मला आणखी काम करण्याची उमेद देणारा ठरेल.
यावेळी विलासराव घुमरे, डॉ. कविता कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने शालेय महाविद्यालयीन व खुल्या गटातील कविता स्पर्धा घेतल्या होत्या. त्यामध्ये शालेय गटात अभियंता मधुकर खडके स्मृति पुरस्कार साक्षी ढेरे, अपूर्वा पवार व तन्वीर दवणे यांना अनुक्रमे तृतीय, द्वितीय व प्रथम क्रमांक मिळाले आहेत. महाविद्यालयीन गटात गुरूवर्य सुमेरसिंग परदेशी स्मृति पुरस्कार दिपाली राऊत, अर्चना शिंदे व ऋतुजा सरतापे यांना अनुक्रमे तृतीय, द्वितीय व प्रथम क्रमांक मिळाले आहेत. खुल्या गटात प्राचार्य प्रभाकर बिडवे स्मृति पुरस्कार संजय अवघडे, प्रज्ञा दिक्षित व रेश्मा दास यांना अनुक्रमे तृतीय, द्वितीय व प्रथम क्रमांक मिळाले आहेत. तर विशेष सन्मान गावगाडा पुरस्काराचे पुरस्कर्ते कवी सोमनाथ टकले यांना देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे खजिनदार डॉ. सुनिता दोशी यांनी केले तर कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन अॅड. प्राची सरवदे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन कवी खलील शेख, दादासाहेब पिसे, मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य नागेश माने, विश्वस्त किरण गायकवाड, संतोष कांबळे, विशाल पाटमास, मोरेश्वर पवार ,दिग्विजय देशमुख, ऋतुजा वीर, अंगद बिडवे, विशाल यादव आदींनी केले..