एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातुन उजनी पर्यटन व कमला देवी मंदिरासाठी निधी मंजूर -

एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातुन उजनी पर्यटन व कमला देवी मंदिरासाठी निधी मंजूर

0

करमाळा (दि.६)  सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातुन करमाळा येथील आराध्य दैवत कमला भवानी देवी मंदिरासाठी पाच कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली. या पाच कोटी मध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, माहिती फलक, स्वच्छतागृह व विश्रांतीगृह, बैठक व्यवस्था, निवारा शेड, पदपथ, पेव्हर ब्लॉक, कचराकूंडी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ई. कामे केली जाणार आहेत.

सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी एकूण 282.75 कोटी निधीस मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिखर समितीची बैठक काल (दि. ४) झाली. या बैठकीमध्ये उच्चाधिकार समिती ने मान्यता दिलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटन आराखड्याविषयी चर्चा होऊन त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली. लवकरच त्याचा शासन निर्णय निघणार आहे. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या तसेच करमाळा तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याचा मार्ग आता खुला होणार असल्याची प्रतिक्रिया आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.

उजनी जल पर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा एकूण 282.75 कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

या पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे मोलाचे योगदान असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

एकात्मिक पर्यटन सर्किटमध्ये उजनी धरणातील जल पर्यटन हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असेल. पर्यटकांना यासोबतच येथे धरणाच्या जलाशयाचा भाग, सभोवतालील निसर्गरम्य परिसर, जल क्रीडा उपक्रम, विविध देशी तसेच विदेशी पक्षी, ईत्यादीचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता येईल. पुढे सर्किट मध्ये परिसरातील कृषी पर्यटन केंद्रे, धार्मिक स्थळे, विनयार्ड पर्यटन, तलाव, किल्ले, वारसा स्थळे यांना भेटी देता येतील. पर्यटकांना साधारणत: आठवडाभर पर्यटन सर्किटमध्ये असलेल्या विविध स्थळांना (जल, धार्मिक, कृषी, नैसर्गिक विनयार्ड पर्यटन स्थळांना) भेटी देऊन पर्यटनाचा आस्वाद घेता येणार आहे. निश्चितच यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटन पूरक उद्योग वाढतील, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल व यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊन जिल्ह्याची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढण्यासाठी गती मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!