पोलीस-पाटील नियुक्त्या रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची काही उमेदवारांनी महसूल आयुक्तांकडे केली मागणी -

पोलीस-पाटील नियुक्त्या रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची काही उमेदवारांनी महसूल आयुक्तांकडे केली मागणी

0

केम (संजय जाधव) – २०२३ मध्ये करमाळा व माढा तालुक्यासाठी झालेली पोलीस पाटील भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली नसून त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या अशी तक्रार करमाळा व माढा तालुक्यातील काही उमेदवारांनी तक्रार सुरवातीला सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.  त्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यातून निवडलेले उमेदवारांच्या नियुक्तीला स्थगित दिली होती.  त्यानंतर या प्रकरणाची चौकशीसाठी त्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमणूक केली होती. 

नेमणूक केलेल्या त्रिसदस्यीय समितीने यावर चौकशी करून तक्रारदारांकडे पुरावे नसल्याने ही स्थगिती उठवली होती.  यानंतर ६ ऑगस्ट २०२४ रोजी  कुर्डुवाडी येथील प्रांताधिकार्‍यांकडून इतर पोलीस पाटील पदाच्या उमेदवारांची नियुक्ती केली गेली. यानंतर तक्रारदार उमेदवारांनी यावर दाद मागणीसाठी पुणे महसूल विभागाचे विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन सदर नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी केली होती व याबाबत काही कारवाईं नाही झाल्यास 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही निवेदनात दिला होता.

तक्रारदार उमेदवारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की,करमाळा व माढा तालुक्यासाठी २०२३ मध्ये झालेली पोलीस पाटील भरती परिक्षाही पारदर्श पद्धतीने झालेल्या नाहीत. परिक्षार्थीना कार्बन कॉपी दिलेली नाही. पात्र उमेदवाराची यादी प्रसिध्द केली परंतु गुण प्रसिध्द केले नव्हते सदर परिक्षेचे उत्तर पत्रिकेमधील सहा प्रश्नांसाठी दिलेले पर्यायातील उत्तरे चुकीची होती. त्यामुळे परिक्षा देणाऱ्या उमेदवार यांनी उत्तरे चुकीची लिहिली. त्यामुळे सदर परिक्षा प्रक्रिया हि पुन: जाहीरनामा प्रसिध्द करून तसेच दुय-या प्रांत अधिकारी यांच्या देखरेखी खाली घेण्यात याव्यात व आता प्रांत अधिकारी कुर्डुवाडी यांनी दिलेली पोलीस पाटील पदाच्या नियुक्त्या त्वरीत विना विलंब रद्द करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.

15 ऑगस्ट पर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याने तक्रारदारांनी पुणे महसूल विभागाच्या आयुक्त कार्यालयासमोर गेल्यानंतर आयुक्तांनी या सर्वांशी चर्चा केली व यावर सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती तक्रारदारांनी संदेश न्यूजला दिली. तसेच आम्ही लागणारे पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयाकडेकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर शाबुद्दीन आमिन सय्यद, रा. सावडी, ता.करमाळा, जि. सोलापुर, चेतन जालिंदर गलांडे, रा. कोंढार, चिंचोली, ता. करमाळा, जि. सोलापुर, करण, कारभारी भोंग, रा. वेणेगाव, ता. माढा, जि. सोलापुर, सौ. पुनम परमेश्वर कोयले, रा. शेंडशिंगे, ता. माढा, जि. सोलापुर, सौ. वैष्णवी प्रशांत काळे, रा. सुरली, ता. माढा, जि. सोलापुर, ज्ञानेश्वर शिवाजी जाधव, रा. आढेगाव, ता. माढा, जि. सोलापुर आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!