साडेतीन हजार कोटींच्या निधीचा आकडा हा खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिलेला - संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

साडेतीन हजार कोटींच्या निधीचा आकडा हा खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिलेला – संजयमामा शिंदे

करमाळा (दि.१९) – साडेतीन हजार कोटींच्या विकास कामाबद्दल मी कधीही वक्तव्य केले नव्हते कारण मी पाच वर्षांत किती निधी आणलेला आहे याचे गणित केलेले नव्हते. सर्व दिलेल्या निधीचे गणित करून खुद्द राज्याच्या अर्थमंत्र्यांनी करमाळा येथे आल्यानंतर हा आकडा सांगितला होता. असे वक्तव्य करमाळा विधानसभेचे अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. काल (दि.१८) करमाळा शहरातील सुभाष चौकामध्ये शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.  सर्व समाजघटकांच्या सेवेसाठी विधानसभेत पुन्हा काम करण्याची संधी द्या असे देखील त्यांनी यावेळी आवाहन केले.

या सभेआधी संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ करमाळा शहरांमधून पदयात्रा काढण्यात आली होती. करमाळा शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून पदयात्रेला सुरुवात व सुभाष चौकामध्ये सभेच्या ठिकाणी पदयात्रा संपली. या रॅलीमध्ये मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर सुभाष चौकात सभा झाली.

वेगवेगळ्या आणलेल्या निधीबद्दल सांगताना ते आमदार शिंदे  म्हणाले की, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बॅकवॉटरला दुष्काळी अनुदान आणण्याचे काम मी केलेले आहे तेही ३४० कोटी रुपयांचे. दहिगाव योजनेसाठी 116 कोटीचे टेंडर काढले. हॅम चा ७१ किमी चा रस्ता तयार करण्यासाठी पावणे तीनशे कोटी रुपयांचा निधी आणला जो की बाकी आमदारांना पाच वर्षात जास्तीत जास्त ३० किमीच्या रस्त्यासाठीच निधी मिळाला आहे. डिकसळ फुलासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी आणला तेही काम प्रगतीपथावर आहे त्यानंतर शिरसोडी ते कुगाव रस्त्यासाठी ३८५ कोटी रुपये चा निधी आणला.

पुढे बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले की,करमाळा विधानसभेचे काम करत असताना व त्याआधीही आपण सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना मला येथील प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली. विकासकामे करत असताना आपण कधीही राजकारण केले नाही, कोणत्या गावात किती मत मिळाली हे पाहुन विकासकामे अडकून ठेवली नाहीत,कोण कोणत्या गटाचा आहे हे पाहुन काम केले नाही.समाजातील सर्व धर्मीय व सर्व जातीय समाज घटकांना सोबत घेत आपण सर्वांच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेऊन काम केले आहे.तालुक्यात प्रलंबीत असणारे रस्ते, पाणी, आरोग्य या बाबतीत भरीव काम केले आहे.शेतकऱ्यांना दुष्काळी मदत असो किंवा वीजेचे प्रश्न असो हे प्रश्न आपण फक्त दोन अडीच वर्षात चांगल्या प्रकारे मार्गी लावले आहेत.

विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून सर्व समाजघटकांच्या सेवेसाठी विधानसभेत पुन्हा काम करण्याची पुन्हा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदयास केले.

यावेळी व्यासपीठावर वेगवेगळ्या व्यक्तींनी भाषण केले कन्हैयालाल देवी यांनी आपल्या भाषणामध्ये जयवंतराव जगताप यांचा उल्लेख करत जगताप यांनी आपण शिंदे यांचे काम करत असल्यामुळे त्यांनी एका भाषणात आधी अर्बन बँकेत ग्राहकांचे अडकलेले पैसे देण्याचा उल्लेख केला होता.  यांवर देवी यांनी पलटवार करत अर्बन बँकेची स्थिती चांगली असल्याचे सांगितले व तुम्ही दहा वर्षे आमदार होतात तुमच्या पतसंस्थेचे काय झालं असा सवाल केला.

सभेच्या अध्यक्षस्थानी मोहंमदभाई शेख हे होते.     व्यासपीठावर कन्हैयालाल देवी, गणेश चिवटे, उद्धव माळी, नागेश कांबळे, विवेक येवले,  संजय घोलप, पै. अफसर जाधव,जगदीश अगरवाल, चंद्रकांत सरडे,वामनदादा बदे,शिवराज जगताप,भोजराज सुरवसे, सुहास गलांडे, विलासराव पाटील, ऍड. अजित विघ्ने, अण्णासाहेब पवार, हर्षल बागल, सुजित बागल, गौरव झाझूर्णे, सूर्यकांत पाटील,बाळासाहेब घाडगे, राजाभाऊ बाबर, हनुमंत मांढरे, भगवानगीरी गोसावी,नितीन झिंजाडे, बंडू शिंदे, बबन चांदगुडे, राजेंद्र बारकुंड,रामभाऊ पवार,अमोल काळदाते , रितेश कटारिया आझाद शेख,अशपाक जमादार,विजय पवार, दादा जाधव,पूजा माने, शीतल क्षीरसागर आदीजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!