‘जगदिशब्द फाऊंडेशन’च्यावतीने कोरोना मध्ये वडील गमावलेल्या मुलांना तिसऱ्या वर्षीही शैक्षणिक साहित्याची मदत..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कोरोनामध्ये वडील गमावलेल्या शेटफळ (ता.करमाळा) येथील सोमनाथ माने यांच्या मुलांना ‘जगदिशब्द फाऊंडेशन’च्यावतीने तिसऱ्या वर्षीही शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली.
दोन वर्षांपूर्वी शेटफळ येथील खासगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे सोमनाथ माने या अठ्ठावीस वर्षीय तरूणाचे दु:खद निधन झाले होते, त्याला तीन लहान मुले आहेत ही बातमी जगदिशब्द फाऊंडेशनचे अध्यक्ष करमाळा तालुक्यातील व्याख्याते जगदिश ओहोळ यांना कळल्यानंतर त्यांनी या कुटुंबाची भेट घेवून त्यांना धीर दिला व त्यांच्या तीन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
गेल्या तीन वर्षांपासून आवर्जून या कुटुंबाची भेट घेऊन ते सर्व शालेय साहित्याची मदत करत आहेत आशा प्रकारची मदत सोगाव येथील कोरोना काळात आई वडील गमावलेल्या बालकांनाही केली असून, या मुलांचे शिक्षण थांबू नये, ती बालके शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत या हेतूने जगदीशब्द फाउंडेशनच्यावतीने हा उपक्रम राबविला जात आहे, शेटफळ व सोगाव येथे साहित्य वितरित करताना व नागरिक उपस्थित होते. तर शेटफळ येथे उद्योजक अशोक शिंदे, शहाजी गोरवे , निलेश पाखरे,गंगासेन वाघमारे,समाधान ओहळ उसामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईकनवरे, गजेंद्र पोळ, योगेश सातपुते, नागनाथ माने उपस्थित होते.
जगदीश भाऊ आमच्या लेकरांसाठी शाळेचं साहित्य घेऊन आठवणीने आले , आमच्या मुलाबाळांच्या एल शिक्षणावर त्यांचं लक्ष आहे, या गोष्टीचा आधार वाटतो. – रूक्मिणी माने (सोमनाथ माने यांच्या आई, शेटफळ)
कोरोनामुळे आईवडील गमावलेली छोटी बालके घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणाचा मुळ प्रवाहापासून दूर जाऊ नयेत व या कुटुंबाच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असुन यामधुन आम्हाला मानसिक समाधानाचा अनुभव मिळतो. – जगदिश ओहोळ (प्रमुख जगदिशब्द फाऊंडेशन)