करमाळा लोकअदालतमध्ये 257 प्रकरणे निकाली - 6 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त रक्कम वसुली.. - Saptahik Sandesh

करमाळा लोकअदालतमध्ये 257 प्रकरणे निकाली – 6 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त रक्कम वसुली..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : : करमाळा येथील न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यु.पी.देवर्षी तसेच तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा एम.पी.एखे यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकअदालत आज (ता.27) आयोजित करण्यात आले होते, या लोकअदालतमध्ये दाखल पूर्व व प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी एकुण 257 प्रकरणे निकाली करण्यात आली असून, यामध्ये एकुण रक्कम 6 कोटी 40लाख 54 हजार 834/- रुपये वसुली करण्यात आली.

या लोकअदालत शुभारंभाप्रसंगी कार्यक्रमास विधी सेवा समिती अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर करमाळा एम.पी.एखे मॅडम तसेच सहदिवाणी न्यायाधीश एस.पी.कुलकर्णी मॅडम असे दोन पॅनल करण्यात आले, यावेळी करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.आर.ए.बरडे व उपाध्यक्ष ॲड.एस.ए.रोकडे उपस्थित होते. यावेळी न्यायाधीश एम.पी.एखे, न्यायाधीश एस.पी.कुलकर्णी तसेच करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.आर.ए.बरडे यांनी लोकअदालत विषयी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी करमाळा बारचे सर्व जेष्ठ विधीज्ञ, सदस्य तसेच कोर्टाचे सर्व क्लार्क उपस्थित होते.

यामध्ये दाखल पूर्व प्रकरणात बँकेची 14 प्रकरणे निकाली झाली असून, यामध्ये 2282000/- ची वसुली करण्यात आली. तसेच नगरपालिका 95 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये 1624460/- रुपयाची वसुली करण्यात आली अशी एकूण (Pre Litigation) दाखलपूर्व प्रकरणे एकुण 109 निकाली करण्यात आली. यामध्ये 3906460/- रुपयाची वसुली करण्यात आली. या न्यायालयामध्ये प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांमध्ये एकूण 148 प्रकरणे निकाली करण्यात आली. यामध्ये तडजोड रक्कम 60148374/- वसुली करण्यात आली. अशाप्रकारे दाखल पूर्व व प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी एकुण निकाली 257 प्रकरणे करण्यात आली. यामध्ये एकुण रक्कम 6,40,54,834/- वसुली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!