व्यसनाधीनता ही एक सामाजिक समस्या -

व्यसनाधीनता ही एक सामाजिक समस्या

0

व्यसन ही एक गंभीर समस्या आहे जी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनावर नकारात्मक परिणाम करते. व्यसनामुळे व्यक्तीचे जीवन पूर्णपणे बदलू शकते, नातेसंबंध बिघडतात, कामावर परिणाम होतो आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 

सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?

मानवाच्या जडणघडणीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यापैकी  पहिली अनुवंशिकता आणि दुसरी  पर्यावरण होय .पहिली गोष्ट जी आहे ती मिळवणे आपल्या हातात नसते. आपल्या आई-वडिलाकडून जे संक्रमित गुण आलेले आहेत  ते म्हणजे अनुवंशिकता होय आणि ते प्रत्येक  व्यक्तीने आनंदाने स्वीकारणे गरजेचे आहे म्हणजेच आपला चेहरा, रंग, डोळे, नाक हे सर्व अनुवंशिकतेने मिळाले असल्यामुळे याच्यामध्ये बदल करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही परंतु दुसरा घटक जो आहे तो म्हणजे पर्यावरण व्यक्ती कोणत्या पर्यावरणात लहानाची मोठी होते यावरती त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अवलंबून असते .

व्यक्तीच्या वर्तनामध्ये इष्ट दिशेने परिवर्तन घडत असेल तर त्याला आपण “शिक्षण” असे म्हणतो आणि अनिष्ट दिशेने परिवर्तन होत असेल तर त्याला आपण ‘व्यसन’ असे म्हणूया.

सुरुवातीला आपण चांगल्या सवयी बद्दल बोलूया

१) वाचन लेखन : ज्या व्यक्तीला वाचन आणि लेखनाचा व्यासंग आहे अशा व्यक्ती जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होतात त्यांच्या विचारांची पातळी उंचावते. वाचनाच्या सवयीमुळेच व्यक्तीला आपले मत व्यक्त करण्यासाठी काहीतरी लिखाण करावेसे वाटते आणि त्यामुळे त्यांचे लेखन कौशल्य देखील सुधारते आपले मत समाजापर्यंत पोहोचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले लेखन होय म्हणून वाचन आणि लेखन यांची सवय लागणे म्हणजे व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास घडवून येणे होय

२) खेळ : व्यक्तीला बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर त्यांचा शारीरिक विकास होणे देखील गरजेचे आहे त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाबरोबर खेळाची आवड निर्माण झाली तर त्याचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि एखाद्या खेळामध्ये प्राविण्य निर्माण करून तो चांगल्या पद्धतीचा खेळाडू देखील होऊ शकतो तेव्हा आपल्या शारीरिक कौशल्यानुसार एखाद्या खेळात प्राविण्य मिळवले तरी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकते म्हणून खेळाची सवय असणे देखील व्यक्तीला इष्ट दिशेने पोहोचवण्याचा मार्ग होऊ शकते

३) व्यायाम : शारीरिक विकासासाठी व्यक्तीला झेपेल एवढा व्यायाम करणे आवश्यक आहे यामध्ये चालणे ,सायकलींग करणे ,पोहणे, प्राणायाम करणे ,योगासने करणे असे सोपे सोपे व्यायामाचे प्रकार केल्यामुळे शारीरिक विकास होण्यास मदत होते

४) अभ्यास : व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी व्हायचा असेल तर विद्यार्थीदशेपासून चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून चांगली गुणवत्ता प्राप्त करून व्यावसायिक शिक्षण घेऊन आपले उज्वल भवितव्य निर्माण करण्याची क्षमता अभ्यासामुळेच होऊ शकते तेव्हा प्रत्येक मुलांनी चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून डॉक्टर, इंजिनियर तसेच स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी बनण्याचा प्रयत्न करणे लहानपणापासूनच अभ्यासाची सवय असेल तर पुढे काही अवघड जात नाही याची जाणीव विद्यार्थ्यांना पालकांनी, शिक्षकांनी करून देणे गरजेचे आहे

चांगल्या सवयीचे आपण आतापर्यंत फायदे पाहिले व्यसन देखील सवयीच असतात परंतु त्या व्यक्तीचा विकास घडून आणण्याऐवजी त्याच्या प्रगतीचा ऱ्हास करणाऱ्या सवयी असतात त्याबद्दल आपण पाहणार आहोत व्यक्तीला कोण कोणत्या प्रकारची व्यसनं असतात ते पुढे आपण पाहणार आहोत

व्यसनाचे प्रकार :

१) पिण्याचे : या प्रकारामध्ये व्यक्ती एखादा मादक पदार्थ पेय म्हणून पीत असतो त्यामुळे त्या व्यक्तीला नशा येते. मादक पदार्थांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असल्यामुळे शरीरामधील अनेक अवयवांना त्याची इजा पोहोचते आणि व्यक्तीचे शारीरिक मानसिक खच्चीकरण होऊन व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते आणि त्यांची कार्यक्षमता कमी होऊन संसार उध्वस्त होतो
२) ओढण्याचे : या प्रकारामध्ये व्यक्ती तोंडावाटे किंवा नाकावाटे नशा निर्माण होणाऱ्या पदार्थाचा दूर घेऊन नशा केली जाते यामध्ये प्रामुख्याने बिडी, सिगारेट, चिलीम द्वारे गांजा ओढला जातो या प्रकारामुळे व्यक्तीला स्वतः  नशा करत असताना समाजातील जवळपासच्या व्यक्तीवर देखील परिणाम घडून येतो बिडी किंवा सिगारेट यांचा 30% धूर फक्त व्यसन करणारी व्यक्ती स्वतःच्या फुफ्फुसात घेते बाकी 70 टक्के धूर बाहेर टाकला जातो त्याचा परिणाम जवळपासच्या व्यक्तीच्या आरोग्यावरती होऊ शकतो
३) खाण्याचे : तंबाखू गुटखा चरस गांजा यासारखे पदार्थ खाऊन नशा आणली जाते तसेच  तंबाखूची मिश्री लावून देखील असे आणले जाते. तंबाखू मध्ये निकोटीन हा घटक असल्यामुळे ते मानवी आरोग्याला खूप घातक आहे भारतामध्ये सर्वात जास्त व्यसन हे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे आहे त्यामुळे अनेक व्यक्तींना तोंडाचा कर्करोग होत आहे तंबाखू खाऊन चुकल्यामुळे तोंडातील लाल रस वाया जातो व त्याचा परिणाम पचनशक्ती वरती होऊन मानवी आरोग्य बिघडते. निकोटीन चा परिणाम जीन्सवरती होऊन व्यंग अपत्य जन्माला येण्याची शक्यता असते.
४) औषधे : खोकल्यावरची वेगवेगळी औषधे घेऊन बरेचसे लोक नशा करण्याचा प्रयत्न करतात. व्हाइटनर किंवा इतर केमिकल्सचा वास घेऊन देखील नशा आणण्याचा प्रयत्न केला जातो

५) खेळ : खेळ म्हणजे व्यायाम प्रकारातले खेळ नसून जुगार, मटका, रमी, लॉटरी, सट्टा इत्यादी खेळाच्या मार्फत व्यक्ती वेळ व पैशाचा दुरुपयोग करत आहे त्यातून त्यांची प्रगती होईल असे नाही कित्येक जणांचे संसार शेअर मार्केट मुळे उध्वस्त झाले आहेत अनेक जणांनी आत्महत्या देखील केलेले आहेत तेव्हा असे खेळ न खेळता शारीरिक विकास होईल असे खेळ खेळणे आवश्यक आहे
६) दृकश्राव्य साधने पाहण्याचे : सध्या लहानापासून वृद्धापर्यंत जे व्यसन लागलेले आहे ते म्हणजे दृकश्राव्य साधने पाहण्याचे होय. दोन वर्षाच्या मुलाला देखील मोबाईल पाहण्याची सवय लागली आहे .आई वडील देखील मुलगा जेवण करत नाही म्हणून मोबाईलचे प्रलोभन दाखवून त्याला जेवण देत आहेत. व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून तरुण पिढी कार्यक्षमते पासून जाऊ लागली लागली आहे जर त्यांची कार्यक्षमता अशा व्यसनाधीनतेमुळे कमी झाली तर देशाची प्रगती होणे लांबच राहिले स्वतःची देखील प्रगती होणे कठीण आहे

युवकांनी कसे असावे ? – तेजस्वी,तपस्वी, तत्परता

व्यसन का लागते? :

व्यक्तीला व्यसन का लागते याची वेगवेगळी कारणे पुढील प्रमाणे
१) पालक : सध्याच्या स्थितीमध्ये तरुणाई व्यसनाकडे वळत असताना पालक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे बरेचसे महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले असताना पालकांच्या निदर्शनास आले तरी ते मुलांचे समर्थन करत आहेत सध्याची पिढीच अशी आहे असे आंधळे समर्थन करत आहेत मुलांना महागडे मोबाईल घेऊन देत आहेत अतिशय मोठ्या किमतीच्या टू व्हीलर घेऊन देत आहेत त्यामुळे बरेचसे तरुण महाविद्यालय शिक्षण घेण्याऐवजी व्यसनाच्या आहारी जात आहेत बरेचसे पालक देखील व्यसनाच्या आहारी गेले असल्यामुळे मुलांनी तरी काय आदर्श घ्यावा
२) परिसर : व्यक्तीची जडणघडण होत असताना परिसर हा महत्त्वाचा घटक मानला जातो आपल्या परिसरामध्ये जर व्यसनी  तरुण असतील तर आपला मुलगा देखील त्यांच्या सहवासाने व्यसनाधीन होण्याची शक्यता असते तेव्हा मुलगा कोणत्या परिसरात वाढतो त्याचे मित्र कसे आहेत यावर देखील व्यसन अवलंबून असते
३) चित्रपट : बरसे तरुण  चित्रपटातील नायक नायकांचे अनुकरण करून व्यसनाकडे वळतात तसेच हायप्रोफाईल राहण्याचा प्रयत्न करतात हाय प्रोफाईल राहण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात
४) फॅशन :: बरेचसे तरुण-तरुणी फॅशन म्हणून एखादं व्यसन लावून घेतात
५) गुरु : गुरुच अनुकरण करणारे अनुयायी देखील आपल्या देशामध्ये भरपूर आहे. गुरु असे करतात मग आपण असे का करायचे नाही अशा पद्धतीने गुरुचा आदर्श ठेवून व्यसन करणारी व्यक्ती देखील भरपूर आहेत
६) संगत : मानवाला मित्र ,संगत चांगले  असतील तर तो व्यसनाकडे कधी जाणार नाही परंतु मित्रांच्या आग्रहामुळे बऱ्याच व्यक्ती व्यसनाकडे वळतात.
७) ताण तणाव : अलीकडे सर्वात महत्त्वाचे व्यसनाचे कारण ठरले आहे ते म्हणजे ताणतणाव व्यवसायामध्ये आलेले अपयश, परीक्षेमध्ये मिळालेले कमी गुण, घरातील व्यक्तीबरोबर झालेला कलह, ऑफिस मधील वरिष्ठाकडून झालेला अवमान, शेअर मार्केटमध्ये एकदम झालेली घसरण अशा अनेक कारणामुळे माणूस व्यसनाचा आधार घेतो राम गणेश गडकरी यांनी “एकच प्याला “हे फार दिवसापूर्वीच नाटक लिहून ठेवली आहे वकिली व्यवसायमध्ये आलेले अपयश घालवण्यासाठी सुधाकर एकच प्याला हातात घेतो आणि आयुष्याची राख रांगोळी करून घेतो हे अतिशय सुंदर नाटकातून दाखवले आहे

व्यसनाचे मानवी शरीरावर परिणाम
१) शारीरिक : कोणत्याही व्यसनामुळे शरीराला फायदा होत नसून शरीरासाठी ते घातकच आहेत अनेक विकार  व्यसनामुळे होतात याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे
२) आर्थिक : कोणतेही व्यसन हे पैसे खर्च केल्याशिवाय करता येत नाही तेव्हा जरी सुरुवातीला मित्रांनी खर्च केला तरी एकदा आपण व्यसनी झालो की तो खर्च स्वतःलाच करावा लागतो त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण होते आणि पूर्ण कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता निर्माण होते

३) कुटुंब : कुटुंबातील एक व्यक्तीला व्यसन असले तरी त्याचा अनिष्ट परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्या वरती निर्माण होतो कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही ताणतणावांमध्ये जीवन जगत असते. अनेक व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीने कुटुंबातील सर्व सदस्यांना संपवण्याचे प्रयत्न केलेले आहेत अशी उदाहरणे देखील पेपरमध्ये वाचायला मिळतात

४) सामाजिक : समाजामध्ये व्यसनी व्यक्तीची मानहानी खूप होते समाज त्या कुटुंबाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो, बऱ्याचश्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबांना सामाजिक बहिष्कार देखील घातला जातो त्यामुळे एक व्यक्ती व्यसन करत असले तरी त्याची झळ इतर सदस्यांना देखील पोहोचते. त्यामुळे आजच सर्वांनी शपथ घेऊन व्यसनापासून दूर राहावे असे मी आवाहन करतो

✍️प्राध्यापक धनंजय पन्हाळकर, नेरले ता.करमाळा मो. ९४२३३०३७६८

प्रा. धनंजय पन्हाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!