निष्काम कर्मयोगी : कर्मवीर भाऊराव पाटील - Saptahik Sandesh

निष्काम कर्मयोगी : कर्मवीर भाऊराव पाटील

बहुजन समाजातील वंचित, उपेक्षित, आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व्यवस्थेने ज्यांच्यासाठी शिक्षणाचे द्वार बंद केले होते त्या सर्व समूहातील मुला-मुलींना शिक्षणाचे ,ज्ञानाचे मंदिर खुले करण्यासाठी निस्वार्थी पणे आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्य करणारे कर्मवीर म्हणजे भाऊराव पायगौंडा पाटील.

त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूर संस्थानातील हातकणंगले तालुक्यातील कुंभाज या गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी झाला होता. भाऊराव पाटील यांचा जन्म जैन समाजात झाला असल्याने त्यांच्या घराण्यास दिगंबर जैन मुनींची परंपरा लाभली होती. जैन समाज अतिशय कर्मठ, अस्पृश्यता,शिवाशिव,व विटाळांच्या रुढी पाळणारा. खुद्द त्यांच्या मातोश्री गंगाबाई सोवळेओवळे पाळीत पण भाऊराव पाटील लहानपणापासूनच बंडखोर वृत्तीचे होते. त्यांना आपल्या या अस्पृश्य गणलेल्या मित्रांबरोबर खेळण्या-बागडण्यास संकोच वाटत नसे. भाऊरावांचे वडील पायगौंडा पाटील हे मुलकी सेवेत असल्याने त्यांच्या बदल्यांमुळे भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण सांगलीतील विट्या गावात व इतर काही गावात झाले.पुढील शिक्षणासाठी भाऊरावांना त्यांच्या वडिलांनी १९०२ च्या दरम्यान कोल्हापूर येथे पाठवले, हायस्कूलमधे दाखल करण्याबरोबरच भाऊरावांना दिगंबर जैन वसतिगृहात दाखल करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे या वसतिगृहाची उभारणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकारातूनच झाली होती,भाऊरावांची बंडखोर व निर्भयवृत्ती यामुळे थोड्या अवधीतच ते शाळेतील व वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे पुढारी झाले होते.

सुरवातीला दिगंबर जैन वसतिगृहाचे श्री. भारदोरे नावाचे सनातनी कर्मठ गृहस्थ व्यवस्थापक होते,सन १९०७ साली श्री‌.अण्णासाहेब लठ्ठे हे वसतिगृहाचे प्रमुख व्यवस्थापक झाले ते महाराजांच्या सल्ल्यावरून. दिगंबर जैन वसतिगृहावर प्रत्यक्ष देखरेख उपव्यवस्थापक भारदोरे यांचीच होती, या वसतिगृहाचे काही नियम कर्मठ व विवेक बुध्दीस न पटणारे असे होते.उदा. जेवताना सोवळ्यात असावे, मुकटे वापरण्याचे बंधन,एके दिवशी भाऊराव पाटील यांनी हे अस्वच्छ झालेले मुकटे वापरण्याचे नाकारले.जेवणापूर्वीच मुलांनी दाढी करावी असा नियम होता. स्वतः लठ्ठे व भारदोरे केव्हाही दाढी करत भाऊरावांस हे खटकले ‘ बोले तैसा चाले ‘ या उक्तीविरुध्द लठ्ठयांचे वागणे त्यांना वाटले. भाऊरावांना दंड झाला पण तो भरण्याचा त्यांनी नाकारले. नंतर १९०८ साली अस्पृश्य मुलांसाठी स्थापन झालेल्या ‘ मिस क्लार्क ‘ वसतिगृहाच्या उद्घाटनास हजर राहिलेल्यांनी अस्पृश्यांचा संसर्ग झाल्याने भोजनगृहात शिरण्यापूर्वी स्नान करावे अशी भाऊरावांवर सक्ती केली तीही भाऊरावांनी धूडकावून लावली. त्यांचे जेवन बंद करण्यात आले, स्वयंपाकघराची दारं खिडक्या बंद केली.भाऊरावांस अतिशय भूक लागली होती,मग काय ? या बलदंड भाऊरावांनी एका खिडकीची तावदाने मोडून भोजनगृहात शिरुन जेवणावर यथेच्छ ताव मारला.

भारदोऱ्यांना डोईजड होणाऱ्या भाऊरावांस वसतिगृहातून बाहेर काढण्याची ही नामी संधी मिळाली, परीक्षा जवळ आल्याच्या ऐन मोसमात भाऊरावांना वसतिगृहातून हाकलून लावले.काही घटना अशा असतात की एखाद्या व्यक्तीच्या जीवनास कलाटणी देणाऱ्या ठरतात, भाऊरावांच्या बाबतीतही अशीच घटना घडली.भाऊरावांस त्यांचा शाळकरी मित्र बाळासाहेब खानविलकर भेटला त्याने भाऊरावांस राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या थेट राजवाड्यावर नेले, महाराजांना त्यांनी भाऊरावांच्या बंडखोरीची हकीकत सांगितली ती ऐकून महाराज खूश झाले.महाराजांनी भाऊरावांस राजवाड्यावर राहणाऱ्या निवडक मुलांच्या समवेत राहण्याची परवानगी दिली, भाऊराव पाटलांना कुस्तीची आवड होती राजवाड्यावर आल्यावर शाहू महाराजांचे भाऊरावांच्या या कलेकडे लक्ष गेले त्यांनी भाऊरावांस कुस्त्यांबरोबर जेष्ठ मल्लांना मालीश करण्याचे देखरेख ठेवणे ही कामं सोपवली. नापास झाल्यानंतर मॅट्रिकच्या वर्गात जाण्यास न मिळाल्याची रुखरुख भाऊरावांपेक्षा त्यांच्या माता-पित्यांना जास्त होती,१९०८-०९ हे साल भाऊरावांनी राजवाड्यावर राहून कुस्तीत व्यतीत केली.या शेवटच्या वर्षातील कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या सानिध्याने भाऊरावांस सत्यशोधक विचारांची भक्कम प्रेरणा मिळाली नव्हे तर भावी समाजसुधारक घडवला गेला यात शंका नाही,

विद्यार्थी दशेपासूनच भाऊरावांना अस्पृश्यतेची चिड होती.एके दिवशी भाऊराव इस्लामपूर येथे आले असता शाळेकडे गेले. पावसाचे दिवस होते. सर्व मुलं वर्गात बसले होते आणि एक मुलगा कुडकुडत वर्गाच्या बाहेरच बसला होता, भाऊरावांनी त्याच्या वर्गातील शिक्षकाची चांगली खरडपट्टी काढली व त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आले व त्याला स्वतःच्या जवळ बसवून जेऊही घातले.नंतर त्या मुलाला कोल्हापूरला नेऊन मिस क्लार्क वसतिगृहात दाखल केले,तो मुलगा पुढे जाऊन आमदार झाला तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या ‘ मूकनायक ‘ या वर्तमानपत्राचा संपादकही झाला.सुट्टीत घरी आल्यावर एके दिवशी संतापलेल्या भाऊरावांनी आईच्या हातातील घागर घेऊन ब्राह्मणांच्या विरोधास न जुमानता पाण्याने घागर भरुन घेतली.सांगली येथील विट्यास असताना अस्पृश्यांना पाणी न देणाऱ्या अस्पृश्यांचा विटाळ मानणाऱ्या विहिरीच्या मालकाचा विहिरीवरील रहाट मोडून फेकून दिला. भाऊरावांच्या मूळ धाडसी,निर्भयवृत्तीस शाहू महाराजांच्या सानिध्याने अधिक धार चढली.

१९०२-०९ पर्यंत भाऊरावांनी शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणा,संस्थानात त्यांनी घेतलेले क्रांतीकारी निर्णय, या सर्व घटना पाहिल्या होत्या.कोल्हापूरातील डांबर प्रकरणात भाऊरावांना काही लोकांनी गोवून त्यांना मारहाण केली प्रसंगी कोणताही गुन्हा नसताना खोटे आरोप करुन त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता ही वेदना मनाला कायम राहील.परंतु भाऊराव यातूनही सावरले पुढील काळात भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. तसेच पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यातही काही काळ काम केले,व इथूनच त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘ रयत शिक्षण संस्थेची ‘ स्थापना सातारा येथील काले या गावी केली,मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी ‘कमवा व शिका ‘ ही योजना राबवली. तसेच साताऱ्यातच सयाजीराव हायस्कूल सुरू केले छत्रपती शिवाजी कॉलेज,गाडगे महाराज कॉलेज ची स्थापन केले.यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली.

‘स्वावलंबी शिक्षण’ शिक्षण हे ब्रीद घेऊन भाऊरावांनी विद्यार्थ्यांना स्वतःची कामे स्वतः करणे, भांडीकुंडी स्वतःच स्वच्छ करणे, स्वयंपाक करणे, बाजारहाट करणे,ही श्रमाची मूल्यं विद्यार्थ्यांमधे रुजवून त्यांना स्वाभीमानाचा आत्मनिर्भरतेचा धडा दिला.भाऊराव स्वतः विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष देत असत ते रात्रीच्या अंधारात दिव्याच्या प्रकाशात मुलं अभ्यास करत आहेत की नाही हे तपासत असत, वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी धान्य गोळा करीत असत, देणगी मिळविण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्न करत होते.सातारा येथे त्यांनी ‘छत्रपती शाहू बोर्डिंग’ सुरू केले होते यासाठी त्यांना बरीच पदरमोड करावी लागली.या वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी गांधींना बोलावले असता ते मिश्कीलपणे भाऊरावांना म्हणाले ‘ महाराज से कितने पैसे लिये’ त्यावर भाऊराव म्हणाले ‘ मैंने उनसे कुछ भी पैसा नहीं लिया उनसे सिर्फ बडा दिल लिया है ‘ भाऊराव पाटलांच्या या अफाट ज्ञान प्रसाराच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांनीही त्यांना साथ दिली.सुरवातीला त्याही सामाजिक रुढी, अस्पृश्यता पाळून होत्या परंतु भाऊराव पाटील या निष्काम कर्मयोग्याच्या शैक्षणिक व सामाजिक सुधारणेच्या कार्याला पाहून त्यांचे मन व आचरण यामधे समतावादी विचार रुजत गेले.व त्याही वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये मिसळत असत स्वयंपाक बनवून देत असत.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी आणि संस्था चालवण्यासाठी जेव्हा आर्थिक संकट निर्माण झाले तेव्हा लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या अंगावरील मौल्यवान दागिने अगदी गळ्यातील मंगळसूत्र देखील विना संकोच देऊन टाकले होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य बहुजनांसाठी खूप मोलाचे होते त्यांची सन्यस्यवृत्ती व बंडखोरपणा यांचा उपयोग त्यांनी खूप विवेक बुध्दीने केला . भाऊराव पाटील शिक्षणात खंड पडल्याने महाविद्यालयीन पदवी घेऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्या महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक सुधारणेच्या कार्याचा झंझावात लक्षात घेऊन पुणे विद्यापीठाने त्यांना ते आजारी असल्याने प्रत्यक्ष ससून रुग्णालयात जाऊन डी.लिट ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. १९५९ साली शासनाच्या पद्मभूषण या पुरस्काराने ही ते सन्मानित झाले.असा हा महान समाजसुधारक शिक्षणमहर्षी नांदणी मठाचा पिठाचार्य न बनता ग्रामीण शिक्षणाला दिशा दाखवून त्याचे रयत सारख्या विशाल वटवृक्षात रुपांतर करुन आचार्य बनून या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आला.ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या महान ऋषीतुल्य कर्मवीरास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

✍️ समाधान दणाने,करमाळा
करमाळा जिल्हा-सोलापूर

error: Content is protected !!