टाळ-मृदंगाच्या गजरात रंगली विद्यार्थ्यांची बालदिंडी!

करमाळा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवस्ती दहिगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून बाल दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत आणि अभंग-भजनांच्या सुरुवातीत गावातून भक्तिमय वातावरणात दिंडी काढली. या दिंडीमध्ये महिलांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.
या प्रसंगी श्री बालाजी पांडुरंग गलांडे यांनी सर्व वारकरी, विद्यार्थी व उपस्थितांसाठी भोजनाची उदार व्यवस्था केली. तसेच श्री संदेश शेळके आणि अमोल मोटे यांनी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप केले. त्यांच्या या सेवाभावी योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
बाल दिंडीमध्ये श्री विठ्ठल पाडुळे, श्री योगेश वाघमोडे आणि श्री महादेव कोंडलकर यांनी पखवाजाची सुरेल साथ देऊन कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली. त्यांच्या वादनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संस्कार, भक्तीभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.



