केममध्ये संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत; हजारो भाविकांची उपस्थिती

केम | संजय जाधव:करमाळा तालुक्यातील केम येथील निमोणी मळ्यातील खंडोबा मंदिर परिसरात सद्गुरू संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे २३ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आगमन झाले. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आषाढी एकादशीच्या दिवशी, २५ जुलै रोजी पहाटे श्रींची महापूजा, सकाळी ९ वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारी श्री बाळूमामा बिरुदेव वालुंग मंडळ, वाळवा तसेच काशिलिंग बिरुदेव ओवीकर मंडळ, पेठ यांच्या सहभागातून शाहिर कृष्णात येडगे व संजय जानकर यांचा भारदस्त ओव्यांचा कार्यक्रम झाला.
सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. वैष्णवीताई महाराज हंगेवाडी यांचे ‘श्री संत बाळूमामा’ या विषयावर कीर्तन झाले. भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा लाभ घेतला. याच दिवशी आयोजित रक्तदान शिबिराला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १५० बाळूमामा भक्तांनी रक्तदान केले.
२६ जुलै रोजी सकाळी श्रींची महापूजा झाल्यानंतर सकाळी ७ वाजता केमनगरीतून भव्य आंबील घागरी, घोडा व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ‘बाळूमामा’च्या जयघोषाने संपूर्ण केमनगरी दुमदुमून गेली. पालखीच्या दर्शनासाठी शहरातील विविध चौकांमध्ये नागरिक व भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मिरवणुकीदरम्यान जेसीबीच्या साहाय्याने भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या या भव्य मिरवणुकीनंतर पालखी मंदिरात पोहोचली. तेथे श्रींची आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या पालखी सोहळ्यासाठी आदमापूर येथून इंद्रजीत सरकार, सतीश जाधव, विठ्ठल पाटील, चंद्रकांत पाटील, वैभव पाटील, विनायक पाटील, संग्राम भांडवले, सचिन सुतार, संभाजी माने, नितीन माने तसेच बी. एम. पाटील सरपंच यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
करमाळा व माढा तालुक्यातील विविध गावांमधून हजारो भाविक पालखी सोहळ्यासाठी उपस्थित होते. केम ग्रामस्थ तसेच निमोणी मळ्यातील बाळूमामा भक्तांनी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.




