दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार : संजयमामा शिंदे

करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन लवकर सुरू व्हावे आणि सर्व लाभार्थी गावांना समान न्याय मिळावा, यासाठी शासनस्तरावर खंबीरपणे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

घोटी (ता. करमाळा) येथे दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाबाबत लाभार्थी गावांतील शेतकऱ्यांची विचारविनिमय बैठक माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. आवर्तन सुरू होण्यास होणारा विलंब, पाणी वितरणातील अनियमितता, लाभार्थी गावांना मिळणारे असमान पाणी आणि नियोजनाचा अभाव याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.



आवर्तन वेळेत सुरू होत नसल्याने उभ्या पिकांचे नुकसान होत असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत असल्याचे शेतकऱ्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबतही यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले.

यावेळी बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले की, आपल्या कार्यकाळात दहिगाव उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळवून देणे, आवश्यक निधी उपलब्ध करून देणे तसेच वीजबिलासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद करून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करून आवर्तन लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच सर्व लाभार्थी गावांना समान पाणी मिळेल, असे नियोजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस सुभाष गुळवे, ॲड. अजित विघ्ने, भरत भाऊ अवताडे, सतीश बागल, रवींद्र वळेकर, विलास काका राऊत, अंगद पाटील, धनाजी ननवरे, तात्यासाहेब मस्कर, बाळासाहेब राऊत पाटील, नानासाहेब लोकरे, राजेंद्रकुमार बारकुंड, चंद्रहास निमगिरे, चंद्रकांत सरडे, तानाजी झोळ यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.

error: Content is protected !!