अडचणींवर मात करत नव्या क्षेत्रात भरारी – बाळासाहेब आमटे यांची वाटचाल..
विशेष लेख…!
घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे शिक्षण नाही आणि शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही, अशा माणसांना कुठंतरी मजुरी करून उपजिवीका भागवावी लागते. पण काहीजण असे असतात की.. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नविन क्षेत्र प्रादाक्रांत करत त्यात यश मिळवून आपले भविष्य घडवित असतात. अशाचप्रकारे पोथरे येथील बाळासाहेब मच्छिंद्र आमटे यांनी आपली प्रगती केली आहे.
पोथरे येथील मच्छिंद्र आमटे व सौ. समाबाई आमटे यांना बाळासाहेब व सतीश अशी दोन मुले आहेत. घरी जुजबी शेती असल्याने फारशी प्रगती करणे शक्य नव्हते. शिक्षणासाठी आवश्यक तो पैसा नसल्यामुळे बाळासाहेबांना जेमतेम बारावी पर्यंत शिक्षण घ्यावे लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोथरे येथे तर माध्यमिक शिक्षण आण्णासाहेब हायस्कूल व बारावी पर्यंत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात २००२ साली पूर्ण झाले.
बारावी पास झाल्यानंतर पुढे शिक्षणासाठी घरातून पाठबळ मिळाले नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी आपल्याला शिक्षण मिळत नसेल तर व्यवसायिक ज्ञान मिळवले पाहिजे व आपले भविष्य घडविले पाहिजे, असा विचार केला. त्यानूसार त्यांचे मामा गणपत दांडेकर (श्रीगोंदा, जि.अहमदनगर) यांचे श्रीगोंदामध्ये मोटारसायकलचे गॅरेज होते. ते बारावी नंतर मामाच्या इथे गॅरेजमध्ये कामाला गेले. दोन वर्षे तेथे मोटारसायकल दुरुस्तीचे कामकाज शिकले.
त्यानंतर त्यांनी पुन्हा करमाळ्याला आपले नशिब अजमाविण्याचा प्रयत्न केला. मुकूंद सुर्यवंशी यांच्या ऑटोमोबाईल दुकान समोर दोन वर्षे तर हरिश्चंद्र घाडगे यांच्या ऑटोमोबाईल समोर चार वर्षे मोटारसायकल दुरुस्तीचे कामकाज केले. त्यानंतर ७ मार्च २०११ ला बाजार समितीतील एक गाळा मिळवून जामखेड रोडला स्वत:चे शनैश्वर ऑटो असे दुकान सुरू केले. स्पेअरपार्ट आणि मोटारसायकल दुरूस्ती ही कामे सुरू केली. करमाळा शहरातील अनेक वाहन असल्याने त्यांनी आपली कामे त्यांच्या दुकानात सुरू केली आणि बाळासाहेबांनी या क्षेत्रात आपली कारकिर्द उंचावली. स्वत:सह चार कारगिर असून अनेक ग्राहक कामासाठी नंबर लावतात हे त्यांचे यश आहे.
बाळासाहेब मच्छिंद्र आमटे यांचा सौ. स्वाती यांचेबरोबर विवाह झाला असून त्यांना आकाश व आकांक्षा अशी दोन मुले आहेत. त्यांनी स्वत: मॅकेनिक झाल्यानंतर आपला भाऊ सतीश यालाही टेक्नीकल नॉलेज मिळायला पाहिजे हे गृहित धरून त्यांना स्लाईडींग विंडो, डोअर याचे प्रशिक्षण दिले आणि त्यांनाही स्वतंत्र दुकान टाकून दिले आहे. सतीश आमटे यांचा सौ. कल्पना यांच्याबरोबर विवाह झाला असून त्यांना सर्वेश व स्वरांजली ही दोन मुले आहेत. बाळासाहेब यांनी केवळ व्यावसायिकच प्रगती केली अशी नाहीतर आपली वाडवडिलार्जित जमिनीची लेवल केली, बांधबंदिस्ती केली. लिंबोणी, केळी अशा फळबागा करून शेतीचीही प्रगती केली असून त्यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. कष्ट, जिद्द व प्रयत्नाच्या जोरावर अडचणीवर मात करून माणूस कसा उभा राहू शकतो; याचे मुर्तिमंत उदाहरण बाळासाहेब आमटे यांचे आहे.