अतिवृष्टीमुळे फळबागांचे पंचनामे सरसकट करावे – राजेरावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे आ.संजयमामा शिंदे यांना निवेदन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालेला आहे. 900 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद शासन दरबारी नोंदलेली आहे.सध्या कृषी विभागाकडून अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. परंतु दृश्य स्वरूपात फळबागामधील नुकसान 33 टक्के पेक्षा अधिक दिसत नसल्यामुळे अनेक फळबागांचे पंचनामे केले जात नाहीत. प्रत्यक्षात येत्या काही दिवसांमध्ये बाधित फळबागांचे नुकसान 50 टक्के पेक्षा अधिक स्वरूपामध्ये दिसेल. त्यावेळेस मात्र शासन पंचनामे करणार नाही .या पार्श्वभूमीवर आज राजेराव रंभा शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन देऊन या संदर्भात आपण महाराष्ट्र शासनाच्या पातळीवरती पाठपुरावा करून तालुक्यातील सर्व फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती केली.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीने बाधित असलेल्या पिकांचे सध्या पंचनामे सुरू आहे. परंतु या पंचनाम्यामध्ये केळी, आंबा,लिंबू,डाळिंब या फळबागांचे पंचनामे केले जात नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.
सध्या फळबागांमध्ये केळी या फळबागेची लागवड करमाळा तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. तालुक्यातील सर्व केळी बागांना पाणी लागल्यामुळे सर्रास केळी पिकांची मुळकुज झालेली आहे .त्यामुळे बागेमध्ये करपा, शिगा टोका, तांबोरा, गडावरील पिटिंग रोग व बुरशीजन्य रोग इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे. अति पावसामुळे तालुक्यातील निर्यातक्षम केळी आत्ता कवडीमोल दराने द्यावी लागणार आहे .प्रत्यक्षात पावसामुळे केळी पिकाचे 50 ते 90 टक्के पर्यंत नुकसान झालेले आहे.
केळी फळबागांप्रमाणेच इतर फळबागांचेही याच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे . तरी तालुक्यातील सर्व फळबागांचे पंचनामे सरसकट करून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा असे निवेदन दिलेले आहे.
या निवेदनाची दखल घेऊन आ. संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांना याविषयी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती राजे रावरांभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी दिली.

