वर्षभरापुर्वीचा पराभव विसरत तो पुन्हा आला आणि जिंकलाही

“काही स्वप्न ही वेळ आल्यावरती पूर्ण होतात. ठेवावा लागतो तो संयम. संयम ही अशी गोष्ट आहे ज्याने ठेवला त्याला अपेक्षेपेक्षा जास्त भेटल. महाराष्ट्राचा वाघ सिकंदर.. तो हरला. पुन्हा उभा राहिला आणि त्याने जिंकून दाखवलं”

पैलवान सिकंदर शेखने या वर्षाचा ६६ वा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अतिशय चुरशीच्या अंतिम लढतीत वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे गतवर्षीचा प्रतिस्पर्धी पैलवान शिवराज राक्षेचा निभाव लागला नाही. लढत सुरु झाल्यानंतर झोळी डाव घेत शिवराजला त्याने उचलून खाली घेतले आणि अवघ्या २४ सेकंदामध्ये चितपट करुन विजय मिळवला. पण हा विजय मिळवायला त्याला ३६५ दिवसांची वाट पाहावी लागली.
मागील वर्षीच्या महाराष्ट्र केसरीच्या सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेख याचा पै. महेंद्र गायकवाड याच्याकडून पराभव झाला होता. यावेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका सिकंदरला बसला असल्याचे त्याच्या समर्थकांकडून सांगितले जात होते. या पराभवानंतर महाराष्ट्रातील त्याचे समर्थक हळहळले होते. परंतु सिकंदर या हार मुळे खचला नाही. पुन्हा नव्या दमाने यावर्षी महाराष्ट्र केसरी जिंकण्याच्या इराद्याने तो उतरला आणि त्याने जिंकूनही दाखवलं.

सिकंदरचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ. त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ अजूनही तिथेच राहतात. सिकंदरचे वडील रशिद शेख स्वत: पैलवान होते.पण आर्थिक परिस्थितीमुळे ते हमाली काम करु लागले. सिकंदरची कुस्ती मोहोळमधूनच सुरु झाली. घरी हालाखीची आर्थिक परिस्थिती असुनही त्याच्या आई-वडिलांनी त्याला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहित केलं. पुढे कोल्हापूर येथील गंगावेस तालमीत सिकंदर कुस्तीची तयारी सुरू केली. एक एक स्पर्धा जिंकत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील ताईत होऊन 66 वा महाराष्ट्र केसरी बनला.
– तुषार तळेकर, केम (ता.करमाळा) मो.7798943077


