पायरी

‘पायरीवर चपला काढू नकोस. जिन्यातील रॅकवरती ठेव.’ हो, त्याच पायरीविषयी बोलतो आहोत. जी उंबरठ्याची सखी आहे. घरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याशी तिची आधी ओळख होते. त्या पायरीवरूनच घराची ओळख होते. मजबुतीचा,एकोप्याचा काही अंशी शिस्त आणि नेटनेटकेपणाचा अंदाज येतो.ही पायरी आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडते. घरात येणारे-जाणारे प्रत्येक पाऊल समतोल राखत जपत असते.
‘ओझ्याची भीती नसते, मानपानाची तमा नसते, पण,अस्तित्वाची खरीखुरी जाण असते.’ लाख तुडवून आले-गेले तरी ती तिची पायरी विसरत नाही.

होय, तीच ती पायरी. पायरीवर रांगोळीची नजाकत सजते, उंबऱ्यासोबत हळदीकुंकू लेवून मोहरते.दिवाळीच्या पणतीने सजते, पावसाच्या सरीने भिजते. होळीच्या उबेने गहिवरते, पंचमीच्या रंगात न्हाऊन निघते. पाडव्याला कडुनिंबी दृष्ट काढते, सीमोल्लंघनाला गेलेल्या दसऱ्याची दारात उभारून आपट्याच्या पानांसोबत वाट पाहते.
माप ओलांडण्याआधी नवी नवी नवरी पहिले लक्ष्मीपाऊल त्याच पायरीवर बावरत, लाजत क्षणभर विसावत पुढे निघते. त्या नव्या पावलांची तीच सखी होऊन जाते.सारवलेल्या अंगणाची मातकट सुवासाची ती साक्ष देते, वाड्यातील भक्कम दगडी भिंतीची सुरुवात ती असते. कट टू कट मापात सगळ्या घराची संयमी, व्यवहारी ओळखही तिच्याच आकारात दिसते. पायरी तिची पायरी ओळखून असते. म्हणूनच रंक असो वा राव, सर्वच पावलांची धूळ मस्तकी लेवून सदा पावन राहते.

नाती जपताना कधी आपल्यांसाठी दोन पावलं मोठेपणानं उतरून खाली यावं, तिथल्या पायरीवरही भेटतात घट्ट मिठीतली, मायेच्या कुशीतली, हळुवार प्रेमाची, झिजकतेची निरागस, निस्वार्थ नाती. त्या पायरीवर सर्व समान असतं. करावं असं कधीतरी दोन पावलांनी खाली उतरून आपल्याच पाऊलखुणा तन्मयतेने पाहाव्यात. कित्येक आपली माणसं कौतुकाने आपली दृष्ट काढताना दिसतात इथेच.
रायगडाच्या अभेद्य कड्यांनी, विशालकाय बुरुजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे पोवाडे गात पावलापावलावर पावन झालेली प्रत्येक पायरी स्वतःला धन्य मानते. जगणे सार्थ झाल्याचे अमीट गीत गाते.रायगडाचे निष्णात, वास्तुशिल्पकार हिरोजी इंदुलकर स्वराज्याशी इमान राखत महाराजांची पायधूळ माथी लागावी म्हणून पायरीवर असणं भाग्य मानतात.
इकडे शेतात जुन्या दगडी विहिरींच्या पायऱ्या आर्ची-पर्शाचं प्रेम घट्ट करून देतात. मोटेवरच्या बारा बैलजोड्यांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा नाद विहिरीतील पायऱ्यांच्या कानात दुमदुमतो आणि खळाळत पाटा-पाटांतून वाहत रानभर पसरतो.बिन पायरीची उताराची मुरमाड विहीर निसरड्या पायऱ्यांवजा पायवाटे तून वेग आणि संयम यांचा ताळमेळ करत अस्तित्व राखून ठेवते.देवालयाच्या पहिल्या पायरीवर असंख्य मस्तके सौहार्द लीन होतात. मीपण गळून पडते आणि नंतरच देवाचं दर्शन घडतं. नामदेवांची पायरी त्याच भक्तीचं द्योतक आहे.

आताशा मोहरलेल्या आंब्याचा हापुसाबरोबरचा गोडवा पायरीला लाभतो. गालावर लालेलाल लाज तिच्या मोहकतेची साक्ष देते. पायरी कोकणातल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील उतारांवरील खाचरांमध्ये तांबड्या मातीत दिमाखात रुजते,सजते,बहरते आणि अखंड गोडवा गाते. सिंहासनाचीही पायघड्यांखाली झाकलेली निमूट पायरी असते. राजाच्या पराक्रमाची, शौर्याची गाथा नकळत टिपणारी. आणि राजमुकुटाला रेड कार्पेटच्या खाली जमिनीवरचं वास्तवतेच भान ठेवायला लावणारी. घरासमोर सिमेंटच्या चिवट घुसखोरीचा रस्ता बनला आणि स्वतःची उंची वाढवत त्याने उंबऱ्याशी सलगी केली. अबोल पायरी आपोआपच मिटून गेली. वास्तव आहे की, भरधाव वाहणारा रस्ता उंबऱयासोबत घरापर्यंत आला. मर्यादेच्या पायरीएवढे अंतर असायलाच हवे सध्याच्या ‘प्रॅक्टिकल’ युगाला.
मनालाही पायरी असतेच की! मर्यादेची!! कोणी कुठे नाही पोहोचणार, तिथे हे मन पोहोचतं. गतिरोधकं कितीही असली तरी वेग सावरत पळतंच राहतं ते मन. त्याला स्वतःला ‘कंट्रोल’ करणारी, मर्यादा न ओलांडू देणारी एक पायरी असतेच. डोळसपणे पाहता(पाळता) आली पाहिजे. एवढंच!

पायरी! माणसाच्या मर्यादेचा ठसठशीत ‘लोगो’ आहे. मग गोष्ट हद्दपार लालसेची, निर्लज्ज वासनेची, आग ओकणाऱ्या रागाची, परिसीमा गाठणाऱ्या प्रेमाची, आंधळ्या विश्वासाची, ओरबाडून खाणाऱ्या धुर्ताची, मतलबी स्वार्थाची, अपार त्यागाची, सहनशीलतेची, क्षितिजापर्यंत जाऊन ठेपलेल्या प्रत्येक गोष्टीची मर्यादेचे कटाक्ष, कायद्याइतकी भक्कम निर्धाराची एक पायरी नक्कीच असतेच असते.
तुझ्या मर्यादेच्या पावलात
राम नावाचा देव
नतमस्तक माझे मीपण सारे
तिथे एक माझी पायरी जपून ठेव
✍️रेश्मा दास ,मो.९८८१०५५९९८

