स्त्रियांना प्रेरणा देणारा - पंडिता रमाबाई यांचा संघर्षमय प्रवास.. - Saptahik Sandesh

स्त्रियांना प्रेरणा देणारा – पंडिता रमाबाई यांचा संघर्षमय प्रवास..

नुकतीच एक बातमी कानावर आली आणि एक स्त्री म्हणून छाती अभिमानाने फुलली…’ भारतीय सेना सशस्त्र दलात महिलांची निवड.’ या एका बातमीने महिलांचा ‘चुल आणि मुल’ते शिक्षण असा अख्खा संघर्षमय प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. महिला शिक्षण घेऊन ज्ञानी तर बनलीच पण इथपर्यंत सीमित न राहता आज तिने स्वतःला सबला असल्याचे सिद्ध केले.भारताचे संरक्षण मंत्रालय प्रमुख ते आर्मी जवान अशा विविध महत्वपूर्ण जबाबदाऱ्या तिने उत्तम पार पाडत आपले कर्तृत्व जगाला दाखवून दिले.
प्राचीन इतिहास पाहिला तर स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते पण मध्ययुगीन काळात महिलांचे स्थान म्हणजे’ चूल आणि मुल’असे सिमित झाले होते. आज या एकविसाव्या शतकात शिक्षण मूलभूत हक्क मानला गेला पण त्या काळात स्त्रियांसाठी गुन्हाच मानला जाई. अशा प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन शिक्षणाची द्वारे भारतीय स्त्रियांना खुली करणारी माझी सावित्रीमाई फुले स्त्रियांसाठी प्रेरणेचा अखंड झरा बनली… तर दुसरीकडे पंडिता रमाबाई यांची शिक्षणाची विलक्षण आवड व ती पूर्ण करण्याचे जिद्द यादरम्यानचा प्रचंड संघर्षमय प्रवास नेहमीच ध्येय हरवलेल्यांना, वाट चुकलेल्यांना,भीती पोटी दबलेल्या स्त्रियांना हत्तीचं बळ देणारा ठरला.

आज महिला दिनाच्या निमित्ताने पंडिता रमाबाई यांच्या प्रेरणादायी कार्याच्या स्मृतीना उजाळा देऊन मी माझा माझ्या भगिनींना एका स्त्रीच्या ठायी असलेला प्रचंड आत्मविश्वास आणि सामर्थ्याची जाणीव करण्याचा एक छोटासा प्रयत्न या लेखाद्वारे करीत आहे. भारतीय इतिहासातील गौरवशाली स्त्रियांमध्ये पंडिता रमाबाई यांचे स्थान अटळ आहे.अनंत संकटांनी आणि विघ्नांनी भरलेल्या रस्त्यावरून चालताना किती दुर्दम्य इच्छाशक्ती असली पाहिजे याचे आदर्श उदाहरण म्हणजे पंडिता रमाबाई.

पंडिता रमाबाई यांचे पूर्ण नाव रमाबाई अनंत शास्त्री डोंगरे. यांचा जन्म 23 एप्रिल 1858 मूळ कर्नाटकातील माळहेरजी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई, भाऊ श्रीनिवास व बहीण कृष्णाबाई असे होते. अनंत शास्त्री डोंगरे यांनी आपली पत्नी व मुलांना सामाजिक रूढी परंपरा विरुद्ध जाऊन स्वतः शिक्षण दिले म्हणून त्या काळाच्या सनातनी लोकांनी त्यांना वाळीत टाकले. समाजाने वाळीत टाकल्यामुळे शास्त्रींचा संसार अगोदरच काट्यांनी भरलेला असताना त्यात 1874 मध्ये दुष्काळाची भर पडली. या दुष्काळात पंडिता रमाबाई यांची आई वडील व बहिण यांचे निधन झाले. पंडिता रमाबाई व त्यांचे बंधू श्रीनिवास वनवन भटकले. पुढे ते कलकत्ता येथे स्थायिक झाले. रमाबाईंच्या हुशारीची चुणूक कोलकत्ता विद्यापीठाच्या एका परिषदेत दिसून आली. त्यांना कोलकत्ता विद्यापीठाने ‘पंडिता’ही पदवी बहाल केली गेली. दरम्यान सर्व काही चांगले झाले असताना अचानकच त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. रमाबाईंच्या आयुष्यात आता कसलाच आधार उरला नाही. त्यावेळी रमाबाईंच्या विद्वत्तेमुळे त्यांना अनेक ICSअधिकाऱ्यांची स्थळे आली परंतु त्यांनी ती नाकारली कारण त्यांना समाजसेवा करण्याचे स्वातंत्र्य गमवावे लागले असते. त्यांच्या विचारांना जाणणारे,समजणारे व प्रोत्साहन देणारे त्यांचे बंधूचे मित्र बापू विपिन बिहारीदास अवधी यांच्याशी 1880 झाली त्यांचा विवाह झाला.

त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव त्यांनी मनोरमा ठेवले. आता सर्व काही सुरळीत चालले असे वाटत असताना त्यांच्या पतीचे 1882 साली आजाराने निधन झाले. पुन्हा त्यांच्यावर संकटाचे आभाळ कोसळले. दोन वर्षांची मुलगी मनोरमाशिवाय त्यांना आता कोणताच आधार उरला नव्हता त्या तिला घेऊन मुंबईला आल्या व आर्य समाजाच्या कार्यात स्वतःला झोकून दिले.त्यांनी अनाथ, विधवा,अपंग अशा महिलांना आधार देण्यासाठी स्वतःचे दुःख विसरून समाजकार्यास सुरुवात केली.त्यांनी ‘आर्य महिला समाजाची’ स्थापना केली. खरचं ,“संकटाच्या चिखलात बुडायचं नसतं, चिखल तुडवून कमळासारखे फुलायचं असतं.”
या विचारांचा प्रयत्न त्यांच्या कार्यातून येऊन गेला. रमाबाईंनी आर्य महिला समाजाचे कार्य प्रभावी होण्यासाठी शारदासदन ची स्थापना 1890 मध्ये केली. पुढे त्याच्या अनेक शाखा सुरू केल्या -अंधांसाठी बातमी सदन, विधवांसाठी मुक्ती सदन, मुलीच्या शिक्षणासाठी सदानंद सदन,वृद्ध व आजारी स्त्रियांसाठी सायंघरकुल, निराधार स्त्रियांसाठी प्रीती सदनची स्थापना केली.

रमाबाईंनी समाजातील अनिष्ट रूढ-परंपरांच्या चिखलाला तुडवून आर्य महिला समाजाचा कार्य विस्तार करत कित्येक महिलांना स्वावलंबी बनवले, शिक्षण दिले. हे करीत असताना त्यांनी स्वतःची शिक्षणाची आवड ही जोपासली.मोठया जिद्दीने व प्रयत्नाने त्या वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे गेल्या.परंतु तेथील थंड वातावरणामुळे त्यांच्या कानांना बहिरेपणा आला आणि दुर्दैवाने त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न अधूरे राहिले. परंतु जेव्हा पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा लंडन येथे पदवीदान समारंभ होतात तेव्हा पंडिता रमाबाई हा या कौतुक सोहळा पाहण्यासाठी आजारी असताना देखील तेथे उपस्थित होत्या.
पुढील काळात सर्व काही बरे झाले असताना नियतीने पुन्हा त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा घाला घातला…त्यांच्या जीवनाचा एकमेव आधार असलेली त्यांची मुलगी मनोरमा हिचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. रमाबाई यांच्या जगण्याचा आता सर्व आधार संपला… एक सामान्य स्त्री तर एवढे दुःखातून कोलमडून गेली असती पण इतर रमाबाई यांनी आयुष्यातील अनेक संघर्षातून सामर्थ्य निर्माण केले होते, हेच त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचे गुपित होते. लवकरच त्यांनी स्वतः ला या दुखातून सावरले ते अनेक दुःखी महिलांची दुःखे दूर करण्यासाठी आणि त्यांनी पुन्हा आपल्या समाज कार्याला सुरुवात केली. त्यांचे मौल्यवान शैक्षणिक योगदान पाहून ब्रिटिश सरकारने देखील त्यांना ‘कैसर-ए -हिंद ‘ही पदवी बहाल गेली. 1882 च्या हंटर कमिशन पुढे देखील रमाबाईंनी साक्ष नोंदवून स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांनी ‘स्त्री धर्मनीती पुस्तक लिहिले. एवढेच नव्हे तर स्त्रीविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी त्या अमेरिकेला गेल्या व ‘रमाबाई असोसिएशनची’ स्थापना बोस्टन शहरात केली.

पुढे 1888 साली रमाबाईंनी ‘द हाय कास्ट हिंदू वुमन’ या त्यांच्या पुस्तकातून त्या काळी उच्चवर्णीय समाजातील स्त्रियांच्या दयनीय परिस्थितीचे वर्णन केले आहे. समाजसेवेचे हे कार्य त्यांनी श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोडले नाही. 5 एप्रिल 1922 रोजी त्यांची कडगाव पुणे येथे त्यांची प्राणज्योत मालवली. पंडिता रमाबाईंनी जगाचा निरोप घेऊन आज शंभर वर्षे उलटली परंतु त्यांच्या कार्याचा सुगंध मात्र आजही दरवळत आहे. भारतीय इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले,कारण त्यांना त्यांच्या प्रयत्नांवर अतुट विश्वास होता आणि स्वतःच्या सामर्थ्याची जाण होती.
मी माझ्या भगिनींना सांगू इच्छिते
“पडल्या असाल हजारदा
पराभवाच्या भयान रात्री,
रडला असाल हजारदा…
पण झाले गेले आता विसर,
मूठ आवळ,अश्रू आवर…
जन्म घेऊनी राखे मधुनी
पुन्हा नव्याने पंख पसर,
स्वतःच्या सामर्थ्यावर पुन्हा एकदा विश्वास कर…”

✍️श्रीमती शकुंतला अरुण पालके, उपशिक्षिका,जि. प. प्रा. शा. दहिटणे, ता. बार्शी जि. सोलापूर, मो. 8888144094

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!