घरात पती-पत्नी झोपले असताना चोरांनी केली धाडसी चोरी

करमाळा (दि.८) : घरात पती-पत्नी झोपले असताना घराच्या मुख्य दरवाजाला छिद्र पाडून आतील कडी उघडून चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह दागिने ताब्यात घेत धाडसी चोरी केली आहे. श्रीदेवीचामाळ येथील कस्तुरबानगर मध्ये ३ जानेवारीला पहाटे ही चोरी झाली आहे. याबाबत अशोक पांडुरंग डोंगरे, रा.कस्तुरबा नगर, श्रीदेवीचामाळ यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२ जानेवारीला रात्री मी व माझी पत्नी जेवण करून एका बेडरूम मध्ये झोपी गेलो. रात्री १० ते पहाटे ३ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाला बाहेरून छिद्र पाडून आतील कडी उघडून घराच्या दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश केला आणि तिथे असलेल्या लोखंडी कपाटाच्या लॉकर मधील सोन्याचे मंगळसूत्र, चेन, झुबे मिळून अंदाजे १,८०,००० रु. किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम रुपये ३५,००० असा एकूण २,१५,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
डोंगरे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरां विरोधात गुन्हा नोंद दाखल केला असून पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.




