‘आदिनाथ’ निवडणूक – एप्रिल मध्ये जाहीर होण्याची शक्यता – प्रत्येक गटातून हालचाली सुरू..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जोरदार हालचाली सुरू झाल्या असून कारखान्याकडून सभासदांची यादी निवडणूक प्राधिकरण यांचेकडे पाठविण्यात आली आहे. त्यानंतर यादीची छाननी होवून व आक्षेप मागवून अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर ही निवडणूक पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत मे २०२२ मध्ये संपली आहे. परंतू शासनाच्या निर्देशानूसार संचालक मंडळास एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे. याबाबत शासनाने सहकारी संस्थाच्या निवडणूका जाहीर करण्याबाबत घोषणा केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानूसार निवडणुकांची तयारी म्हणून सभासदांची यादी कारखान्यास निवडणूक प्राधिकरणाने मागितली होती, तशी यादी देण्यात आली आहे.
आदिनाथ कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर संचालक मंडळाने हा कारखाना बारामती ॲग्रो कारखान्याकडे भाडेपट्ट्याने देण्याचे ठरले होते. तांत्रिक बाबीत हा कारखाना अडचणीत आला असताना व बारामती ॲग्रोने वेळेवर सुरू केला नाही. त्याचवेळी आदिनाथ बचाव समितीने हा कारखाना भाडेतत्वावर देण्यास विरोध केला होता. दरम्यान न्यायालयीन लढाई सुरू असतानाच राज्यातील सरकार बदलले आणि शिंदेफडणवीस सरकारने विशषेत: आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी या कारखान्यास आर्थिक बळ दिले.
माजी आमदार नारायण (आबा) पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांच्या एकत्रित प्रयत्नाने हा कारखाना सभासदांच्या माध्यमातूनच चालू करण्याचे ठरविले. विशेष म्हणजे २५ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मोळी टाकून कारखान्याचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर या कारखान्यात तब्बल ७६ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करण्यात आले. शासनाने जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिले, परंतू आदिनाथची निवडणूक घेण्याची सूचना केली नव्हती. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रार करून आदिनाथची निवडणूक लावावी; अशी मागणी केली होती. निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक ती मतदार यादी प्रक्रिया एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एप्रिल अखेरला ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
सध्या आदिनाथ कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व माजी आमदार नारायण पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखाना सुरू केला होता. आगामी निवडणूक हे दोघे एकत्र लढतात की स्वतंत्र लढतात; याची तालुक्याला उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजुला आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्रच असून ही निवडणूकही हे एकत्रच लढण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान आमदार रोहित पवार हे ही या आदिनाथच्या निवडणुकीकडे कोणत्या नजरेतून पाहतात किंवा निवडणुकीत किती लक्ष घालतात; याची परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान आदिनाथ बचावच्या वतीने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे हे आत्तापासूनच प्रयत्न करू लागले आहेत. निवडणूक जर बिनविरोध झाली नाहीतर कदाचित बचाव पॅनल स्वत:चा पॅनलही उभा करू शकतो; असे बचाव समितीचे महेश चिवटे यांनी सांगितले.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना २१ जागा..
ऊस उत्पादक- १५, महिला – २, सोसायटी – १, इतर मागास प्रवर्ग – १, अनुसूचित जाती – १, भटक्या विमुक्त जाती- १. सभासद – २८६००, सहकारी संस्था मतदार५२६ पैकी ४१८ चे ठराव प्राप्त. –

–