ऊत्तरेश्वर मंदिरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरा सुरू करण्यासाठी शिवसेनेकडून मंदिर समितीला निवेदन

केम(संजय जाधव): केम(ता. करमाळा)येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानातील बंद असलेला सीसी कॅमेरा सुरू करावा, अशी मागणी उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष वर्षा चव्हाण यांनी देवस्थान ट्रस्टला निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की श्री ऊत्तरेश्वर देवस्थान हे स्टेशन रोडवर असून येथील सीसी कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिकडेच गावातील एका नागरिकाची गाडी चोरीला गेली असून चोरट्यांनी मंदिरासमोरूनच गाडी नेली. जर कॅमेरा सुरू असता, तर तपासासाठी पोलिसांना त्या फुटेजचा उपयोग झाला असता, असे नमूद करण्यात आले आहे.


तसेच या मंदिरालगतच श्री ऊत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज असून, या कॉलेजमध्ये केम व परिसरातील अनेक मुली शिक्षण घेतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे सीसी कॅमेरे सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने त्वरित हे कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.




