जेऊर पोस्ट कार्यालयाला आग – सर्व कागदपत्रे, वस्तू जळून खाक..

करमाळा(दि.१०)जेऊर (ता.करमाळा) येथील पोस्ट कार्यालयाला अचानक आग लागून संपूर्ण पोस्ट कार्यालय जळून खाक झाले आहे, अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही, परंतु ही आग आटोक्यात आणण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

या लागलेल्या आगीत पोस्ट कार्यालयातील सर्व कागदपत्रे, पोस्टाचे टपाल, पार्सल वस्तू,सर्व महत्वाचे बॅंक कागदपत्रे यात जळून खाक झाले आहेत, ही आग विझविण्यासाठी करमाळा नगरपालिकेची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल होवून आग विझवली आहे. आज (ता.१०) महावीर जयंती असल्याने कार्यलायाला सुट्टी होती, त्यामुळे आज कार्यालयात कामकाज बंद होते, यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग इतकी भयानक स्वरुपात होती कि कार्यालयाच्या छतावरुन धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यामुळे जेऊर ग्रामस्थांनी ठिकाणी मोठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनीही मदतीसाठी मोठे प्रयत्न केले. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही, परंतु ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे तसेच ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.

आग लावली का लागली..?
जेऊर पोस्ट ऑफीसला आग लागली आहे, पण ही लागली की लावली यावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्ट ऑफीसमधील काही कर्मचारी व अधिकारी यांच्या लाखो रूपये अपहरण प्रकरणी चौकशी सुरू असून, त्यातून पोस्ट कार्यालयाची वसुलीसुध्दा झालेली नाही, असे समजते, त्यामुळे ही आग लागली का लावली अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे..


