'रिटेवाडी उपसासिंचन' योजनेसाठी आपण प्रयत्नशील : माजी आमदार नारायण पाटील - Saptahik Sandesh

‘रिटेवाडी उपसासिंचन’ योजनेसाठी आपण प्रयत्नशील : माजी आमदार नारायण पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्याच्या संपूर्ण विकासासाठी रिटेवाडी उपसासिंचन योजना ही अत्यंत उपयुक्त असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही योजना मंजुर करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

२३ ऑगस्टला माजी आमदार पाटील यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने ‘सा.कमलाभवानी संदेश’शी ते बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले, की करमाळा तालुक्यासाठी कुकडीचे पावणेसहा टीएमसी पाणी राखीव ठेवलेले आहे. प्रत्यक्षात मात्र अर्धा टीएमसी सुध्दा पाणी या तालुक्याला मिळत नाही. कुकडी धरणापासून करमाळा तालुका हा जवळपास २५० किलोमीटर अंतरावर असल्याने हे पाणी मिळत नाही. त्यामुळे रिटेवाडी उपसासिंचन योजना ही उजनीवरून अत्यंत उपयुक्त व तातडीने होणारी योजना आहे.

शासनाने पावसाळ्यात चार महिने वाहून जाणारे पाणी रिटेवाडी उपसासिंचन योजनेतून घेण्यास परवानगी दिल्यास त्यातून शेतकऱ्याचा फायदा होईलच पण भविष्यातील कृष्णा-भीमा स्थिरीकरणानंतर ही योजना बारा महिने चालवून तालुका पूर्ण बागायत होवू शकतो. याबरोबरच सध्याच्या शासनाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत.

करमाळा तालुक्यातील अजुनही वीजेचा मोठा प्रश्न आहे. तसेच प्रशासकीय सेवेतील अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्याच्या प्रगतीवर होत आहे. ही बाब आपण वरीष्ठांच्या निदर्शनास आणून रिक्त जागा भरण्यासाठी विनंती केली असल्याचेही माजी आमदार पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!