सुरताल संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत नृत्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.. - Saptahik Sandesh

सुरताल संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत नृत्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सुरताल संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत नृत्य महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. दिल्ली, आसाम, गोवाहाटी,ओरीसा या राज्यातून आलेल्या कलाकारांनी आपल्या कलेतून रसिकांची मने जिंकली.

करमाळा येथील सूरताल संगीत विद्यालयाचा रजत जयंती कार्यक्रमानिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्ली येथील डॉ.आम्रपाली त्रिवेदी, डॉ. मनीषा देवी गोस्वामी: गुवाहटी (आसाम) भरतनाट्यम, गुरु स्वप्नाली गोस्वामी: गुवाहटी (आसाम) सत्रिय नृत्य, डॉ. पंकज नामसूद्रा: गुवाहाटी (आसाम) सत्रिय नृत्य, ज्योतिर्मयी मोहंती: भुवनेश्वर (ओरिसा) ओडिसी नृत्य इत्यादी विविध राज्यातील नामवंत कलाकारांनी आपली कला प्रस्तुत केली. या कलाकारांना संस्थेच्या वतीने “सुर सरस्वती” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर विद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी ही आपले गायन- वादन सादरीकरण केले.

या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांना विद्यालयाच्या वतीने ‘संगीत रसिक’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते अंक प्रकाशन ही करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर कामगार न्यायालयाचे न्यायाधीश मा. शरद देशपांडे साहेब, ॲड शिरीष देशपांडे, ॲड.डॉ.बाबुराव हिरडे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर, मकाई साखर कारखान्याचे माजी संचालक विवेक येवले, राष्ट्रवादी सेलचे अशपाक जमादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विलासराव घुमरे म्हणाले की, सुरताल संगीत विद्यालयासाठी भविष्यात सर्वतोपरी मदत केली जाईल. यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील म्हणाले की, श्री नरारे सर यांनी सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक लहानापासून मोठ्यापर्यंत विद्यार्थी घडविण्याचे काम अगदी मनापासून केलेली सेवा आहे. याच सेवेच्या माध्यमातून अनेक कलाकार तयार होत आहेत. देश विदेशातून ही कलाकार येऊन करमाळा सारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन आपली कला सादर करतात. त्यामुळे करमाळ्याचे नाव देशातच नाही तर बाहेर देशात सुद्धा पोहोचविण्याचे काम नरारे सरांनी केलेले आहे. त्यामुळे सूर ताल विद्यालयासाठी आपण तन-मन-धनाने सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.

यावेळी करमाळा तालुक्यातील पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील संगीत रसिकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, सूत्रसंचालन रेश्मा जाधव, सायली पदमाळे, सारिका विटूकडे यांनी तर आभार कु. स्वराली जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!