करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 220 शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविणार : मनोज राऊत.. - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 220 शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविणार : मनोज राऊत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : बदलापूर येथील घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. यानुसार करमाळा तालुक्यातही शैक्षणिक विभागात क्रांती होत आहे. जिल्हा परिषदेच्या २३० शाळांपैकी १० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. उर्वरित २२० शाळांमध्ये जिल्हा नियोजन समिती तसेच पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया तातडीने सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या २३० प्राथमिक शाळा असून खासगी अनुदानित व विना अनुदानित अशा ८८ शाळा आहेत. या खाजगी शाळांपैकी ४३ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून ४५ शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहेत. त्यानूसार संबंधित शाळांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.

पोलीसदादा व पोलीसदिदी असे कार्यक्रम करमाळा पोलीसांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत राबविले जाणार आहेत; अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे. यानूसार महिन्यातून एकदा पोलीस प्रत्येक शाळेत जाऊन मुलांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी समजून घेणार आहेत.

शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी सखी सावित्री समिती, परिवहन समिती व बालसुरक्षा समिती याची उभारणी प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असून त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे.

करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समिती, परिवहन समिती व बालसुरक्षा समिती स्थापन केली जाणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा बरोबरच ज्या ठिकाणी स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी पंचायत समितीच्या आराखड्यातून व १५ वा वित्त आयोगातून खर्च करून स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. शाळा सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पालकांनी योग्य ते लक्ष दिले पाहिजे. पंचायत समिती मार्फत प्रत्येक शाळेत मुलींना बॅड टच व गुड टच याचा प्रोग्राम घेतला जाणार आहे. …मनोज राऊत (गटविकास अधिकारी, करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!