करमाळ्यात तुरीचा 10,591/- इतका उच्चांकी दर - शेतकऱ्यांनी तुरीसह अन्य शेतमाल विक्रीस आणावा : सभापती जयवंतराव जगताप.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात तुरीचा 10,591/- इतका उच्चांकी दर – शेतकऱ्यांनी तुरीसह अन्य शेतमाल विक्रीस आणावा : सभापती जयवंतराव जगताप..

सभापती जयवंतराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीमधे प्रतिदिनी तुरीचा भाव वाढतच असून, आज (ता.2) शुक्रवार साडेदहा हजाराचा टप्पा ओलांडत 10,591/- इतका उच्चांकी दर मिळाला आहे, शासन निर्धारीत हमीभावापेक्षा जादा दर मिळत असून, शेतकऱ्यांनी आपला तुरीसह अन्य शेतमाल विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

सध्या तुरीची दररोज सर्वसाधारणपणे पाचशे कट्टे च्या घरात आवक होत असून, दर वाढतच आहेत, तुरीला सरासरी दहा हजार व कमाल साडे दहा हजारांहून अधिक दर मिळत आहे, तुरीसोबतच ज्वारी , हरभरा व मका या पिकांची देखील आवक आता वाढत आहे, तुरीच्या सरासरी उत्पादनात झालेली घट, तुरीची मागणी यामुळे दरात वाढ झालेली दिसत आहे. करमाळा बाजार समितीमधे सध्या दररोज पन्नास लाखाची उलाढाल होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ओस पडलेल्या करमाळा बाजार पेठेवर याचा काही अंशी का होईना सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, तरी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल लवकरात लवकर आणावा व चांगल्या भावात आपला शेतमाल विक्री करावा असे आवाहन सभापती जयवंतराव जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!