उत्तरेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करत राबविले स्वच्छता अभियान - Saptahik Sandesh

उत्तरेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करत राबविले स्वच्छता अभियान

केम(संजय जाधव) : श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम यांचे घोटी या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले. या सात दिवसाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये श्रमदान करून संपूर्ण गाव स्वच्छ केले. विशेषतः येथील स्मशानभूमी ही स्वच्छ सुंदर केली. गावातील श्री हनुमान मंदिर, श्री कोटलिंग मंदिर, श्री महादेव मंदिर, सरकारी दवाखाना, जि.प.मराठी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, गावातील रस्ते अतिशय स्वच्छ केले. रस्त्याच्या कडेला असणारी झाडे झुडपे तोडून रस्त्यावरील अडथळा दूर केला.

मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख व गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत, राष्ट्रीय सेवा योजना पुणे विभागीय समन्वयक श्री पोपटराव सांबारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज, केम यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे हे पहिलेच शिबिर घोटी या गावात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मणराव राख यांनी केले होते.

या शिबिराच्या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रवचनकार श्री महादेव वाघमोडे महाराज अकलूजकर, सरपंच श्री विलासकाका राऊत, शालेय समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर, पत्रकार श्री राहुल रामदासी, प्रा.अमोल तळेकर, मुख्याध्यापक श्री कमलाकर सांगळे, श्री लक्ष्मण मोरे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे श्री महादेव वाघमोडे महाराज यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बदलती मानसिकता आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. सरपंच श्री विलासकाका राऊत यांनी या उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि यापुढेही घोटी ग्रामस्थांचे अशा सामाजिक उपक्रमास सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले.

सुलेखन-प्रशांत खोलासे (मो. 9881145383)

श्री वसंत तळेकर यांनी या शिबिरातून होणारा विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास व देशप्रेमाची भावना याविषयी मनोगत व्यक्त केले. श्री गणेश तळेकर यांनी श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजच्या या उपक्रमाचे कौतुक करून अशा शिबिरात विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती आत्मीयता निर्माण होते असे सांगितले.

या शिबिरादरम्यान प्रा.अमोल खारे यांचे कविता विद्यार्थ्यांच्या मना-मनातली, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री अभिमन्यू गुटाळ यांचे आजचा विद्यार्थी आणि मोबाईलचा गैरवापर, प्रा. नानासाहेब पवार यांचे महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, श्री विजयकुमार गुंड यांचे आजची तरुणाई, श्री भरत जाधव यांचे अध्यात्माचे आजच्या काळात महत्व अशी प्रबोधनपर व्याख्याने संपन्न झाली. महिला सक्षमीकरण कार्यक्रमात सौ. सुप्रिया मनोज राऊत, सौ. भाग्यश्री बोबडे पाटील यांनी महिला सबलीकरण या विषयावर गावातील महिलांसमोर व्याख्यान दिले. आधुनिक शेती क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी गावातील प्रगतिशील शेतकरी श्री हिराजी राऊत यांच्या शेतात भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान अवगत केले.
याप्रसंगी या शिबिरादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी प्र.प्राचार्या सौ. वैशाली नरखेडकर, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ. संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.सतीश बनसोडे, प्रा.पराग कुलकर्णी, श्री सचिन रनशृंगारे, श्री लक्ष्मण गुरव, श्री सागर महानवर, श्री ओंकार घाडगे, श्री वैजीनाथ दोलतडे, श्री लक्ष्मण थोरात, श्री शिवाजी लोकरे, पत्रकार श्री ज्ञानेश्वर काशीद यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!